लहान मुलं देवाचं रूप, घडलेला प्रकार भयंकर, निषेध तरी कशा कशाला म्हणावं? बदलापूरच्या घटनेवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil: बदलापूर येथील चिमूरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त करत या घटणेबद्दल हळहळ व्यक्त केलीय.
Manoj Jarange Patil On Badlapur School Crime News : बदलापूर (Badlapur) येथील दोन चिमूरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यात तीव्र उद्रेक उमटताना दिसून येत आहे. बदलापूरमध्ये (Badlapur School Crime) या घटनेला हिंसक वळण लागले असून संतप्त जमावाने रेल्वे स्टेशनवर दगडफेकीच्या घटना देखील घडल्या आहेत. तर दुसरीकडे या घटनेतील आरोपीला फाशी होत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलक बदलापूरकरांनी (Badlapur News) घेतलाय. परिणामी, बदलापूर रेल्वे स्थानकात आणि रेल्वे रूळावर सध्या आंदोलन सुरू केलंय. तर दुसरीकडे या संतापजनक घटनेचे पडसाद आता राज्याच्या सर्व स्तरातून देखील उमटताना दिसत आहे. याबाबत आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करत या घटणेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
SIT चौकशी नेमली असेल तर दूध का दूध पाणी का पाणी होईल
लहान मुलं देवाचं रूप असतं. त्या निरागस जीवाला काय कळतं, मात्र चार- चार वर्षांच्या मुलींवर जर शाळेत अत्याचार होत असेल तर ही परिस्थिती खूप अवघड आहे, भयानक आहे. अशा घटनांचा निषेध तरी कसा आणि कुठं करावा, किंबहुना निषेध देखील कशाला म्हणावं? हे खूप अवघड झाले असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. राज्याचे गृहमंत्री आणि पोलिसांकडून या घटनेची योग्य ती चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई केली पाहिजे. आता या प्रकरणी एसआयटी (SIT) चौकशी नेमली असेल तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच. मात्र घडलेला प्रकार अतिशय गंभीर आणि संतापजनक असल्याचेही ते म्हणाले.
....तर गृहमंत्री लोकांना धोपटून काढतात
राज्यातील इतर पालकांनाही चिंता वाटणे स्वाभाविक आहे. आपल्या लेकरांची चिंता त्यांना वाटणारच कारण ते छोटे छोटे लेकरं आहेत. असे कृत्य करणारा कोणीही असेल तर त्याला कशाला माफ पाहिजे. शिक्षाच झाली पाहिजे. मात्र राज्यात कायदा सुव्यवस्था चांगली राहिली तरी काही लोक राहू देत नाहीत. गृहमंत्री लोकांना धोपटून काढतात. पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडून जाते. त्यामुळे त्यांना शांतता नकोच आहे. असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. घडलेली घटना ही अतिशय लाजिरवाणी आणि वाईट घटना आहे. पुरोगामी महाराष्ट्रात गोरगरिबांना न्याय कुठे आहे, आहे ते फक्त भाषण आहे? लक्ष सत्तेवर आहे की जनतेवर आहे याच्यावर हे राज्यासाठी अवलंबून आहे.
सरकारला फक्त खुर्ची पाहिजे
गृहमंत्री असोत किंवा सरकार असो आपलं लक्ष कशावर आहे यावर सगळं अवलंबून आहे. यांचे जर लक्ष सत्तेवरच असलं, तर सामान्य जनतेवर अन्याय होणारच आणि तो अन्याय बंद करायचा असला तर आपल्या स्वतःला सक्षम व्हावं लागणार आहे. त्यात धर्म जातीपातीचा काही संबंध नाही. मात्र सध्या सरकारचे लक्ष गोरगरीबांना न्याय देण्यासाठी आणि अत्याचार होतोय त्याला न्याय देण्यासाठी नाही, यांना फक्त खुर्ची पाहिजे. अशी टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
हे ही वाचा