(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावाकडून तरुणाची हत्या
सुमित आणि भाग्यश्री हे वर्गमित्र होते. त्यांच्या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झालं आणि त्यानंतर त्यांना लग्न करण्याच निर्णय घेतला. मात्र त्यांच्या लग्नाला भाग्यश्रीच्या कुटुंबियांचा विरोध होता.
बीड : प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावानेच तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे. सुमित वाघमारे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सुमितचा दोन महिन्यापूर्वी वर्गामैत्रिण भाग्यश्रीसोबत प्रेम विवाह झाला होता.
सुमित इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत होता. बीड शहरातील मावशीकडे शिक्षणासाठी सुमित राहत होता. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्रीसोबत त्याचे प्रेम जुळले. तब्बल तीन वर्षानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, मात्र दोन्ही कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. मात्र घरच्यांच्या विरोध झुगारून भाग्यश्री आणि सुमितने लग्न केलं.
सुमितशी लग्न केल्याचा राग मनात ठेवूनच भाग्यश्रीच्या भावाने त्याची हत्या केली. इंजिनीअरिंगची परीक्षा देऊन परतत असताना भाग्यश्रीचा भाऊ आणि त्याच्या मित्रांनी सुमितवर धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सुमीतचा जागीच मृत्यू झाला, तर भाग्यश्री या हल्ल्यात जखमी झाली आहे. हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमीतच्या मदतीसाठी भाग्यश्री याचना करत होती.
आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुमितच्या नातेवाईकांनी केली आहे. सुमितवर हल्ला करणारे तिघेही आरोपी घटनेनंतर फरार झाले असून पोलिसाकंडून त्यांचा शोध सुरू आहे.