National Sports Day : भारतीय हॉकीला सुवर्णयूग दाखवणाऱ्या ध्यानचंद यांचा जन्मदिन, आज 'राष्ट्रीय क्रीडा दिवस'
Major Dhyan Chand : मेजर ध्यानचंद यांच्या स्मरनार्थ आज राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातोय. आजच्या दिवशी या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 'खेल पुरस्कार' देऊन गौरवण्यात येतं.
नवी दिल्ली : भारतात ज्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती त्यावेळी भारतीय हॉकीचे सुवर्णयुग सुरु होतं. त्यावेळी भारतीय संघात असा एक खेळाडू होती कि ज्याची किर्ती जगभर पसरली होती. या खेळाडूचे हॉकीतील कौशल्य असं होतं की, त्याच्या हॉकी स्टिकला बॉल चिकटला आहे का हे विदेशी लोक तपासायचे. हा खेळाडू म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यान चंद (Major Dhyan Chand). आज त्यांचा जन्म दिवस. त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून भारतात आज राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतोय.
भारत देश गुलामीत होता त्यावेळी भारताची विदेशातील ओळख म्हणजे गांधी, हॉकी आणि ध्यानचंद अशीच होती. मेजर ध्यानचंद अर्थात ध्यानचंद सिंग यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रुपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडिल सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटीश सैन्यात होते. ते सुद्धा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले
भारतीय हॉकीला सुवर्णकाळ मिळवून देणाऱ्या मेजर ध्यानचंद यांना जागतिक क्रीडा विश्वात हॉकीतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखलं जायचं. त्यांची खेळातली चपळता आणि कौशल्य जबरदस्त होतं. त्यामुळंच त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा.
हिटलरने हॉकी स्टिक मागवली
मेजर ध्यानचंद यांच्या जीवनात 1936 चे बर्लिन ऑलिम्पिक हे सर्वात महत्वाचं होतं. या स्पर्धेत भारताचा अंतिम सामना थेट जर्मनीशी होता. हा सामना बघण्यासाठी स्वत: हिटलर हजर होता. पण त्यामुळे ध्यानचंद यांच्या खेळावर कोणताही परिणाम झाला नाही. भारतीय संघाने लागोपाठ गोल करायला सुरु केल्यानंतर हिटलरने ध्यानचंद यांची हॉकी स्टिक तपासण्यासाठी मागितली होती.
जर्मनी संघाचा पराभव होताना हिटलर पाहू शकत नव्हता. त्याने पहिल्या हाफ मध्येच मैदान सोडलं. पण धानचंद यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली. पण ध्यानचंद यांनी ती ऑफर विनम्रपणे नाकारली.
मेजर ध्यानचंद यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत 400 पेक्षा अधिक गोल केले, जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भारत सरकारने 1956 साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला.
खेलरत्न पुरस्काराचे नाव आता 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार'
भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा गौरव म्हणून या पुरस्काराचे नाव आता 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' असं असणार आहे.