Mahayuti Seat Sharing In Maharashtra : पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
नाशिकच्या जागेवरून गेल्या अनेक दिवसांपासून घमासान सुरु आहे. या जागेवर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून एकाच वेळी दावा करण्यात आल्याने नेमकी जागा जाणार तर कोणाकडे अशी स्थिती होती.
Mahayuti Seat Sharing In Maharashtra : महाविकास आघाडीच्या जागावाटपानंतर महायुतीमधील रखडलेलं जागावाटप कधी होणार? अशीच चर्चा रंगली होती. राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्पे पूर्ण झाले, तरी महायुतीकडून अजूनही सात जागांवर उमेदवार आणि कोणकडे जागा जाणार? याबाबत अजूनही रणनीती ठरलेली नाही. त्यामुळे जागावाटपावरून महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे की नाही? अशीच चर्चा रंगली होती. मात्र, आता पुढील 24 तासांमध्ये महायुतीमध्ये रखडलेल्या सर्व जागांवरती महायुतीकडून घोषणा केली जाणार आहे.
ठाणे आणि नाशिक शिवसेना शिंदे गटाला?
मिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक रस्सीखेच झालेल्या ठाणे आणि नाशिक या जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकच्या जागेवरून गेल्या अनेक दिवसांपासून घमासान सुरु आहे. या जागेवर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून एकाच वेळी दावा करण्यात आल्याने नेमकी जागा जाणार तर कोणाकडे अशी स्थिती होती. मात्र, नाशिकची जागा आता शिंदे यांनी आग्रह कायम ठेवल्याने त्यांच्या वाट्याला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दक्षिण मुंबईवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच
दुसरीकडे कल्याणच्या जागेवर देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर ठाण्यावर सुद्धा भाजपकडून दावा करण्यात आला होता. मात्र, ही जागा सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आपला बालेकिल्ला असल्याने आपल्या सोबत ठेवल्याची माहिती आहे. दुसरीकडे, अजूनही पालघर आणि दक्षिण मुंबईवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे या जागा आता कोणाच्या वाटण्याला जातात याकडे सुद्धा लक्ष असेल.
ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे तीन नावाची चर्चा आहे. त्यामध्ये आता प्रताप सरनाईक यांचं नाव आघाडीवर असल्याचे समजते. या ठिकाणी नरेश मस्के आणि रविंद्र फाटक यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे. मात्र, या चर्चेत आता प्रताप सरनाईक यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे, तर दक्षिण मुंबईमधून मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
नाशिकमध्ये उमेदवारी कोणाला?
नाशिकची जागा शिंदे गटाला गेली असली, तरी उमेदवारीबाबत मात्र अजूनही सस्पेन्स कायम आहे. खासदार हेमंत गोडसे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी ठाम असून त्यांनी नाशिक ते ठाणे तसेच मुंबई असा मोठा प्रवास गेल्या काही दिवसांपासून सुरुच ठेवला आहे. छगन भुजबळ यांनी माघार घेऊनही घोळ संपलेलान नाही. त्यामुळे आता उमेदवारीची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार की अन्य कोणता पर्याय निवडला जाणार? याकडे सुद्धा लक्ष असेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या