Mahatma Gandhi : गांधी विचारांचा प्रचार आणि प्रसारासाठी वाहिलेलं धुळ्यातील गांधी तत्वज्ञान केंद्र
Mahatama Gandhi Death Anniversary : महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र ही 70 वर्षांहून अधिक जुनी संस्था महात्मा गांधीजींच्या विचारांची व त्यांच्यावरील निष्ठेची साक्ष आहे.
Mahatama Gandhi : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संचलित कै श्री रामेश्वर पोद्दार व कै शालिग्राम भारतीय संस्थापित महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे शहरात कार्यरत आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात गांधी विचारांनी प्रेरित झालेल्या रामेश्वर पोद्दार, बाळूबाई बहता, शंकरराव देव, शालिग्राम भारतीय या गांधींवर निष्ठा ठेवणार्या व्यक्तींनी गांधी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व त्यांची स्मृती जपण्यासाठी या केंद्राची स्थापना केली. महात्मा गांधी विनोबा भावे महादेवभाई देसाई पूज्य साने गुरुजी पंडित नेहरू जयप्रकाश नारायण यासारख्या ब्रिटिश सरकार विरोधी लढा देणार्या स्वातंत्र्य सेनानींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आहे. महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांना खान्देशने नेहमीच साथ दिली आहे. धुळे शहर आणि खान्देशात गांधी विचारांचा प्रभाव असलेल्या अनेक महनीय व्यक्ती त्या काळात होत्या धुळे शहर व खानदेशच्या इतिहासात त्यांची गौरवपूर्ण नोंद आहे. 70 वर्षांहून अधिक जुनी ही संस्था महात्मा गांधीजींच्या विचारांची व त्यांच्यावरील निष्ठेची साक्ष आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले हे केंद्र मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर 19 हेक्टर क्षेत्रफळात कार्यरत आहे. नरहर भावे विनोबा भावे शिवाजी भावे यांच्या प्रदीर्घ सहवासाने पुनीत झालेल्या या ऐतिहासिक केंद्राचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे सन 1995 ला हस्तांतरण करण्यात आले.
एकादश व्रत आणि रचनात्मक कार्य ही गांधीजींच्या जीवनातील सूत्रे होती व्यक्तिगत व्रताने त्यांनी सामाजिक व्रताचा आश्रय दिला. त्यांच्यामुळे व्रतांना सामाजिक मूल्य आणि प्रतिष्ठा मिळाली या केंद्रात गांधीजींच्या समग्र जीवनाचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास व्हावा गांधी विचारांना गती मिळावी विद्यापीठ शिक्षण संस्था विद्यापीठ स्तरावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून ही मूल्ये रुजविली जावी हा हस्तांतरण यामागचा हेतू होता. कस्तुरबा गांधी कुटीर केंद्रातील दोन इमारतींपैकी एका इमारतींना कस्तुरबा अभ्यास कुटीर नाव देण्यात आले आहे. 25 बाय 15 आकाराची दुमजली इमारत तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे या इमारतीला कस्तुरबा गांधी अभ्यास कुटीर नाव देण्यामागची पार्श्वभूमी तेवढीच प्रेरणादायी आहे गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा यांच्या निधनानंतर शालिग्राम भारतीय मूलचंद गिदोडिया या गांधी निष्ठावान व्यक्तींनी आगाखान पॅलेस येथे महात्मा गांधींची भेट देऊन त्यांच्या स्मृती जपण्यासाठी स्मारक उभारण्याची गांधीजींकडे परवानगी मागितली मात्र गांधीजींनी प्रथम नकार दिला परंतु पुन्हा पुन्हा आग्रह धरल्यामुळे अखेर संशोधन करणार्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास कुटीर उभारण्यास परवानगी दिली, आज संपूर्ण भारतात कस्तुरबा यांच्या नावाने चालवली जात असलेली ही एक मात्र अभ्यासिका आहे.
महादेवभाई देसाई स्मारक
सन 1942 च्या स्वातंत्र्ययुद्धात हौतात्म्य पत्करलेल्या महादेव भाईनी सर्व आयुष्य महात्मा गांधींच्या सेवेला महाराष्ट्र सेवेला वाहिले होते. ते गांधीजींचे मानसपुत्र होते राष्ट्रीय आंदोलनादरम्यान ते धुळ्यातील स्वातंत्र्यसेनानी सोबत काही काळ राहिले पुढे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी या केंद्र परिसरात त्यांच्या नावाने स्मारक उभे राहिले. स्वतंत्र चळवळीतील काकासाहेब कालेलकर आप्पासाहेब पटवर्धन शंकरराव देव यांच्या प्रयत्नांनी उभारलेले स्मारक आजही नव्या पिढीला प्रेरणादायी ठरत आहे. पिता पुत्रांची समाधीस्थळे केंद्र परिसरात दोन इमारती सोबत कै नरहर भावे व कै शिवाजी भावे यांची समाधी स्थळे आहेत. कै नरहरी भावे आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात या केंद्रात राहिले 26 ऑक्टोबर 1947 रोजी शरद पौर्णिमेला वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांचे याच ठिकाणी निधन झाले. कै शिवाजी भावे यांनी देखील आयुष्यातील सर्वाधिक काळ याच ठिकाणी घालवला. त्यांचेही निधन येथे झाले. या पिता पुत्राची एकत्र समाधी आजही सुस्थितीत येथे पाहायला मिळते.
विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा कणा हे विद्यापीठाच्या अंतरी पेटवून ज्ञानज्योत हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास रोजगाराभिमुख शिक्षण नेतृत्वगुण कलाकौशल्य राष्ट्रीय एकात्मता शिबिर युवक-युवती कार्यशाळा स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणार्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग शाळा महाविद्यालय स्तरावर विविध विषयांवर व्याख्यानमाला जनजागृतीपर उपक्रम गांधी जीवन चित्र प्रदर्शन पोस्टर स्पर्धा निबंध स्पर्धा परिसंवाद चिंतन शिबिर या सोबत धुळे शहर व परिसरातील विद्यार्थी व नागरिकांसाठी निशुल्क ग्रंथालय सुविधा या केंद्रामार्फत पुरविल्या जातात केंद्र परिसरात जवळपास शंभर वृक्षांची लागवड केली असून सिमेंटचे बेंच व ओटे अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत निसर्गाच्या सान्निध्यात अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी आजवर स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केले आहे. धुळे जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व पीएचडी च्या संशोधकांना उपयुक्त संदर्भग्रंथ उपलब्ध करून दिले जातात पर्यटनासाठी आलेल्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तत्वज्ञान केंद्राची ऐतिहासिक सांस्कृतिक व राष्ट्रीय आंदोलनात असलेली पार्श्वभूमीची माहिती दिली जाते.
स्वातंत्र्य लढ्याची प्रेरक भूमी
स्वतंत्र चळवळीच्या काळात गांधी विचारांनी प्रेरित झालेल्या व्यक्तिमत्त्वांचा या केंद्राच्या उभारणीत मोलाचा वाटा आहे. यात प्रामुख्याने रामेश्वर पोद्दार ,बाळू भाई मेहता, शालिग्राम भारतीय यांची नावे घेता येतील. गांधींप्रति आजीवन निष्ठा ठेवून सामान्यांकरिता, राष्ट्राकरिता प्राण दिलेली ही माणसं आजही नव्या पिढीला प्रेरणा देत आहेत. धुळे कारागृहात पूज्य विनोबा भावे साने गुरुजी जमनालाल बजाज यांच्या आलेला संबंध. याच अनुषंगाने खान अब्दुल गफारखान महात्मा गांधी गुलजारी लाल नंदा, पंडित नेहरू, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई यांसारख्या महान व्यक्तींचा परीसस्पर्श या केंद्राला झाला आहे.
1935 मध्ये या परिसरात गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली खानदेश गोसेवा अंतर्गत खानदेश गो शाळेची स्थापना करण्यात आली. जी आजही कार्यरत आहे. महान विभूतींच्या वास्तव्याने पावन झालेले हे केंद्र खानदेश आणि संपूर्ण देशाकरिता राष्ट्रीय सांस्कृतिक ठेवा आहे. हे केंद्र महात्मा गांधी आणि त्यांचे विचार निष्ठा आणि प्रेमाचे प्रतिक आहे. व्यक्तीला त्यांचे विचार सामर्थ्य प्रदान करतात गांधीजींनी अखिल मानव जातीला अहिंसा आणि सत्य ही मूल्ये दिली गांधींच्या विचारांना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे कार्य केंद्रातर्फे अविरत सुरू आहेत. ज्या मानवी मूल्यांसाठी गांधीजी आयुष्यभर झटले त्या मूल्यांची सद्यस्थितीतील गरज पाहता समाजापर्यंत हे विचार पोहोचण्याचा प्रयत्न केंद्राकडून होत आहे. केंद्राची उभारणी पासून ते आजपर्यंत जे उपक्रम राबविले गेले आहेत. समाजातील विविध स्तरातून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.