(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahashivratri 2022 : भारतातील 12 ज्योतिर्लिंग, जाणून घ्या पौराणिक महत्व
Mahashivratri 2022 : भारतात शंकराची अशी एकूण 12 महत्वाची मंदिरे आहेत. या 12 मंदिरांना (द्वादश) ज्योतिर्लिंगे असे म्हणतात.
Mahashivratri 2022 : दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 1 मार्च रोजी महाशिवरात्र आहे. हिंदू धर्मात पुराणांनुसार, शिवलिंग ज्या बारा ठिकाणी स्वतः प्रकट झाले तेथे शिवलिंगांची ज्योतिर्लिंगाच्या रूपात पूजा केली जाते. भारतात शंकराची अशी एकूण 12 महत्वाची मंदिरे आहेत. या 12 मंदिरांना (द्वादश) ज्योतिर्लिंगे असे म्हणतात. ज्योतिर्लिंग स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये बारा ज्योतिर्लिंगांची नावे, त्यांचे स्थान सांगितले आहे. त्याप्रमाणे ज्योतिर्लिंग स्तोत्र दिले आहे.
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोंकारं ममलेश्वरम् ॥1॥ परल्यां वैजनाथं च डाकियन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥
धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे. हा क्रम नेमका कसा आहे ते जाणून घ्या.
1. सोमनाथ (गुजरात -गीर सोमनाथ जिल्हा/वेरावळ)
2. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)
3. महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)
4. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर,खंडवा जिल्हा)
5. वैजनाथ (महाराष्ट्र - परळी, बीड जिल्हा)
6. भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर,खेड तालुका, पुणे जिल्हा)
7. रामेश्वर (तामिळनाडू - रामेश्वर,रामनाथपुरम जिल्हा)
8. नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ,हिंगोली जिल्हा)
9. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)
10. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा)
11. केदारनाथ (उत्तराखंड - केदारनाथ,रुद्रप्रयाग जिल्हा)
12. घृष्णेश्वर (महाराष्ट्र -वेरुळ,खुल्ताबाद तालुका, औरंगाबाद जिल्हा).
1. सोमनाथ (गुजरात -गीर सोमनाथ जिल्हा/वेरावळ)
सोरठी सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. सोमनाथचे पहिले मंदिर पूर्व-ऐतिहासिक काळापासून अस्तित्वात आहे असे मानले जाते. दुसऱ्यांदा सोमनाथ मंदिरावर सिंधच्या अरब राज्यपालांनी हल्ला केला आणि नष्ट केला जो यादव राजांनी पुन्हा बांधला. गुर्जर राजा नागभट्ट दुसरा याने हे मंदिर लाल दगडांनी बांधले.
1024 मध्ये गझनीच्या महमूदने ते पाडण्याचा प्रयत्न केला, जे पुन्हा बांधण्यात आले, परंतु तीन शतकांनंतर सोमनाथ मंदिर पुन्हा एकदा सुलतान अलाउद्दीन खिलजीच्या सैन्याने उद्ध्वस्त केले, त्यानंतर 1783 मध्ये इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर बांधले. कारण या प्रसिद्ध मंदिराचे मुस्लिमांनी मशिदीत रूपांतर केले होते, मग मशिदीतून मंदिर पुन्हा बांधण्याचे श्रेय राणी अहिल्याबाईंना जाते. 1974 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या मूळ जागेवर पुनर्बांधणीचा आदेश दिला आणि सोमनाथ मंदिर आज आपण पाहतो ती स्वातंत्र्योत्तर भारतात बांधलेली भव्य रचना आहे.
2. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)
श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हैद्राबादपासून सुमारे 210 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पूर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगात वसलेले हे (शिव) तीर्थक्षेत्र आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची 476 मीटर आहे. येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे. तसेच येथे कृष्णा नदीच्या काठावर जाण्यासाठी रज्जूमार्ग आहे. येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मिती केंद्र आहे.
3. महाकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे हिंदू मंदिर असून ते भगवान शिव यांना अर्पण केलेले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिराला तीर्थक्षेत्रांमध्ये भगवान शिवचे सर्वात पवित्र निवासस्थान असे म्हटले जाते. हे मध्य प्रदेश राज्यात उज्जैन येथे आहे. रुद्र सागर तलावाच्या बाजूला हे मंदिर आहे. शिवलिंगाचे देव, भगवान शिव हे स्वयंभू आहेत असे समजले जाते.
4. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर,खंडवा जिल्हा)
ओंकारेश्वर एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये मंधाता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे. हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मोरटक्का गावापासून जवळपास 12 मैल (20 कि.मी.) अंतरावर आहे. हे द्वीप हिन्दू पवित्र चिन्ह ॐ च्या आकारामध्ये बनले आहे.
5. वैजनाथ (महाराष्ट्र - परळी, बीड जिल्हा)
परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी 300 फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते. तसेच येथे परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.
6. भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर,खेड तालुका, पुणे जिल्हा)
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगांमधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.
7. रामेश्वर (तामिळनाडू - रामेश्वर,रामनाथपुरम जिल्हा)
रामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे. रामेश्वरम शहर तमिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखातामध्ये असलेल्या रामेश्वरम द्वीपावर वसले आहे. या बेटालाच पंबन बेट म्हणतात. पंबन बेट हे भारताच्या मुख्य भूमीला पंबन पुलाने जोडले आहे. रामेश्वरम हे श्रीलंकेच्या मन्नार द्वीपापासून 50 किमी अंतरावर आहे. रामेश्वरममध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर आहे. रामेश्वरम हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. रामायणामध्ये भगवान श्रीरामांनी रामेश्वरममधूनच लंकेमध्ये आपले सैन्य नेण्यासाठी रामसेतूची रचना केली होती. सध्या ह्या सेतूचे केवळ अवशेष शिल्लक असून एकेकाळी हा सेतू भारतीय उपखंडाला श्रीलंका बेटासोबत जोडणारा अखंड दुवा होता हे सिद्ध झाले आहे.
8. नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ,हिंगोली जिल्हा)
भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणार्या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव आणि तालुका आहे. आमर्दकपूर (औंढा-नागनाथ, जि. हिंगोली) हे ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक असे आहे. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. 'आमर्दक सन्तान' या नावाने ओळखल्या जाणार्या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता. यामुळेच दरवर्षी औंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीच्या यात्रेला गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांतून भाविक दर्शनासाठी येतात.
9. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)
विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुल्बउद्दीन ऐबक याने पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक वर्ष दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके गेल्यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले.
10. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा)
त्र्यंबकेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.ते तालुक्याचे ठिकाण आहे. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगम याच त्र्यंबकेश्वरात झाला.
11. केदारनाथ (उत्तराखंड - केदारनाथ,रुद्रप्रयाग जिल्हा)
केदारनाथ हे भारताच्या उत्तराखंड राज्यामधील एक लहान गाव आहे. केदारनाथ हे अतिप्राचीन केदारनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवान शंकराचे केदारनाथ मंदिर भारतामधील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.
केदारनाथ गाव समुद्रसपाटीपासून 3,583 मीटर उंचीवर हिमालयामध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर वसले आहे. गौरीकुंड या गावापर्यंतच वाहनाने प्रवास शक्य असून केदारनाथला पोचण्यासाठी तेथून 14 किलोमीटर अंतर पायवाटेने पार करावे लागते.
12. घृष्णेश्वर (महाराष्ट्र -वेरुळ,खुल्ताबाद तालुका, औरंगाबाद जिल्हा)
घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha