Maharashtra Winter Session 2024: सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
Maharashtra Winter Session 2024: या हिवाळी अधिवेशनात विशेष म्हणजे आमदारांना फायलींचं ओझं कमी होणार आहे. जाणून घ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीच्या अपडेट्स एकाच क्लिकवर
Maharashtra Winter Session 2024: विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या ओठी असताना सरकारस्थापनेच्या आधीच हिवाळी अधिकवेशनाच्या तारखा समोर आल्या आहेत. १६ डिसेंबर ते २४ डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांसाठी डिजिटल आसनव्यवस्था असणार आहे. यासाठी युद्धपातळीवर काम सुरु झालं आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या आधी सत्तास्थापनेसाठी एक विशेष अधिवेशन मुंबईला होणार आहे. त्यासाठी २८८ आमदारांपैकी ७८ आमदार पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत.
सरकार स्थापनेच्या आधीच हिवाळी अधिवेशनाची तयारी
राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा होत आला असून मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, सरकारस्थापनेच्या आधीच आता हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरु झाली आहे. नवीन महायुती सरकारचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन असणार आहे.सरकार स्थापन झाल्यानंतर ऐनवेळी तयारी करणं शक्य नसल्यानं आता नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला गती आली आहे.या हिवाळी अधिवेशनात विशेष म्हणजे आमदारांना फायलींचं ओझं कमी होणार आहे. विधानसभा सभागृहात आमदारांच्या आसनासमोर सभागृहाच्या दैनंदिन कामकाजासह इतर माहिती देणारी डिजीटल स्क्रीन बसवण्यात येत आहे.ज्यामुळे आमदारांना सभागृहाच्या कामात सहभागी होताना सर्व माहिती एका क्लिकवर मिळवता येणार आहे.विधानपरिषद च्या आमदारांसाठी डिजिटल आसन व्यवस्था असणार आहे.
कधी होणार हिवाळी अधिवेशन?
राज्यातील नवनिर्वाचित २८८ आमदारांचं सरकार स्थापन झाल्यानंतर १६ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. पण अद्याप सरकार स्थापन न झाल्याने २८८ आमदारांना एकत्र बोलवत सत्ता स्थापनेचं एक अधिवेशन मुंबईला होणार आहे. यासाठी २८८ पैकी ७८ हे पहिल्यांदा विधानसभेत पोहचले आहे. त्यात भाजपचे ३३, शिंदे गट शिवसेना १४, अजित पवार गट राष्ट्रवादी ८, ठाकरे शिवसेना १०, कांग्रेस ६, शरद पवार गट राष्ट्रवादी ४ व इतर ३ आमदारांचा समावेश आहे.