Heat Wave: कोकण किनारपट्टीला दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, दुपारी 11 ते 4 या वेळेत काळजी घेण्याचं आवाहन
Heat Wave In Maharashtra: कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा जास्त प्रभाव असणार आहे. भारतीय हवामान विभागाने हा इशारा दोन दिवसांसाठी म्हणजे आज आणि उद्या दिला आहे.
Heat Wave In Maharashtra : मुंबई : राज्यभरातून थंडीनं काढता पाय घेतल्यानंतर हळूहळू आता घर्मबिंदूंनी उन्हाळा येत असल्याची जाणीव करून द्यायला सुरुवात केलीच होती की त्यातच आता हवामान खात्यानं उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave in Maharashtra) इशारा दिलाय. पुढील दोन दिवसात कोकण किनारपट्टी आणि कच्छमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. या काळात तापमान 37 ते 39 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः दुपारी 11 ते 4 या वेळेत काळजी घेण्याचं हवामान खात्यानं आवाहन केलंय.
हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा जास्त प्रभाव असणार आहे. भारतीय हवामान विभागाने हा इशारा दोन दिवसांसाठी म्हणजे आज आणि उद्या दिला आहे. सोमवारी मुंबई, रायगड रत्नागिरी या जिलह्यांसाठी इशारा दिला आहे. तर मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यासाठी इशारा दिला आहे. हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. यंदा उन्हाळा लवकर आला आहे. सध्या तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
#Heatwave alerts by IMD Mumbai @RMC_Mumbai for #Maharashtra, #Konkan area for 48 hrs.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 20, 2023
Though Yellow Alerts, but still TC pl.
Avoid outside between 11-2pm if possible. Water bottle necessary.
🍉🍉🍊🍊🍋🍋🥛🥛🧢🧢🌳🌳☂ pic.twitter.com/AQUpIZLSYz
पिकांना फटका बसण्याची शक्यता
बदलत्या हवामानाचा मोठा फटका राज्यात खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांना बसला होता. पूर, पाऊस आणि दुष्काळामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. अशातच आता रब्बी पिकांना (Rabi Crop) देखील या बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. सध्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळं गव्हाच्या पिकाला या वाढत्या तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पिके वाचवण्यासाठी काय व्यवस्था करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
उन्हाळ्यात अशी घ्या काळजी
हिवाळा संपताच लगेच उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. दरम्यान असं असले तरी काळजीचं कारण नसून आवश्यक त्या उपाययोजना नागरिकांनी कराव्यात. त्याचसोबत उकाड्यापासून वाचण्यासाठी पाण्याची बाटली, आणि उन्हापासून वाचण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे त्यांचं शरीर आतून हायड्रेट राहतं. उन्हाळ्यात लिंबू पाणी, ज्यूस, सरबत प्या. मुलांना उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घालायला लावा. कॉटनचे कपडे लगेच घाम शोषून घेतात. कॉटनचे कपडे शक्यतोवर हलक्या रंगांचेच असावेत.