Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Alert: सध्या कमी दाबाचा पट्टा झारखंड आणि त्याला जोडून उत्तर छत्तीसगडच्या भागात सक्रीय आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
Maharashtra Rain Alert: राज्यात काही काळाचा ब्रेक घेतल्यानंतर पाऊस पुन्हा एकदा ॲक्टीव्ह मोडवर येणार आहे. भारतीय हवामान विभागानं शनिवारपासून पुन्हा धुंवाधार पावसाचा इशारा दिला असून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सध्या कमी दाबाचा पट्टा झारखंड आणि त्याला जोडून उत्तर छत्तीसगडच्या भागात सक्रीय आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात व मराठवाड्यातही दिसून येईल.
पुढील दोन दिवस हलक्या पावसाचे
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार १८ व १९ सप्टेंबर रोजी राज्यात मराठवाड्यासह खान्देशात हलक्या सरींच्या पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारी पावसाचा जेार मध्य महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, रायगडसह मराठवाड्यातही राहण्याची शक्यता आहे.
पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात पुढील ४८ तासांत पावसाचा जोर वाढणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून त्यानंतर संपूर्ण विदर्भ मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
- शुक्रवार दि २० सप्टेंबर रोजी जळगाव जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
- शनिवार दि २१ सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
- रविवारी दि २२ सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज आहे.