Maharashtra Weather Update: तळकोकण, पुण्यासह राज्यभरात पावसाचे तीव्र अलर्ट, येत्या 4 दिवसांत जोर वाढणार, IMD नं सांगितलं...
Maharashtra Rain Forecast: राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात 2-3 अंशांची घट होणार असून येत्या तीन ते चार दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मोसमी पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या चार दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असून भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहेत. आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ व कोकणपट्टीवर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. येत्या चार दिवसांत राज्यभरात पावसाची शक्यता असून तळकोकणासह मध्य महाराष्ट्रातील पुणे साताऱ्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. कुठे काय शक्यता आहे? कोणत्या जिल्ह्यात कसं वातावरण राहणार आहे? कोणते अलर्ट देण्यात आलेत? पाहूया सविस्तर (Rain)
हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यात नैऋत्य मोसमी पावसांनी हजेरी लावल्यानंतर बेफाम पावसाने आधी नागरिकांची धांदल उडाली. सकल भागात पाणी साठल्याने प्रवाशांची तारांबळही उडाली. नंतर पावसाने उघडीप घेतली होती. आता राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. प्रादेशिक हवामान अंदाजानुसार, राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात 2-3 अंशांची घट होणार असून येत्या तीन ते चार दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मोसमी पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. (IMD Forecast)
आयएमडीच्या अंदाजानुसार, 12 जूनपासून देशभरात मान्सून पुन्हा सक्रीय होणार असून पुढील काही दिवसांत पश्चिम किनाऱ्यांवर पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक वातावरणामुळे राज्यभरात प्रचंड उकाडा वाढलाय. अनेक भागात हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे.
कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
आजपासून राज्यभरात पावसाची हजेरी लागणार असून हवामान विभागाने दक्षिण महाराष्ट्रासह तळ कोकणात तीव्र पावसाचे अलर्ट दिले आहेत.
11 जून- मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, पालघर, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा व कोकणात सिंधुदूर्ग वगळता इतर सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट आहे.
12 जून- सांगली,कोल्हापूर, सिंधुदूर्ग जिल्हयाला ऑरेंज अलर्ट, पालघर व नंदूरबार वगळता उर्वरित भागात पावसाचा यलो अलर्ट
13 जून- रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्हयांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नाशिक, धुळे, नंदूरबार व पालघर वगळता उर्वरित जिल्ह्यांना पावसचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
14 जून- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट व मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांना यलो अलर्ट देण्यात आलाय.
हेही वाचा:






















