Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा इशारा, तर विदर्भात उन्हाचा कडाका; वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather : आजही (12 एप्रिल) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
Maharashtra Weather : सध्या राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal rains) थैमान घातलं आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका भसला आहे. त्यामुळं बळीराजा पुरता कोलमडलाय. अशातच आजही (12 एप्रिल) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. तर उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळीचा जोर वाढणार असून, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. तर दुसरीकडं विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे.
अवकाळी पावसामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहे. फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं बळीराजा हतबल झाला आहे. अशातच आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर दुसरीकडं विदर्भतील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा देखील तापला आहे. त्याचबरोबर जळगाव, परभणी आणि सोलापुरातही तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे.
उद्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार उद्या (13 एप्रिल) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गीरपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मार्च महिन्यात राज्यातील 28 जिल्ह्यांना अवकाळीसह फटका
मार्च महिन्यात राज्यातील सुमारे 28 जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मोठा फटका बसला. त्यामुळं शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्याची भरपाई म्हणून राज्य सरकारनं चार महसुली विभागांसाठी 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे. सोमवारी (10 एप्रिलला) याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. राज्यातील सुमारे 2 लाख 25 हजार 147 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यातून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: