Maharashtra Weather : मुंबई, पुण्यात हुडहुडी! मराठवाड्यासह विदर्भातही पारा घसरला
Cold Weather Update : राज्यात गारठा कायम असून मुंबईसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही तापमानात घट झाली आहे.
Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा पारा चांगलाच घसरला आहे. विदर्भ (Vidarbh) आणि मराठवाड्यानंतर (Marathwada) आता मुंबई (Mumbai) आणि ठाण्यातही (Thane) थंडी वाढली आहे. शहरात थंड वारे वाहत असून पारा 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. रविवारी महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर' महाबळेश्वरमध्ये 15 अंशापर्यंत घसरल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. त्याशिवाय नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातही तापमान 9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं आहे. महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणजेच महाबळेश्वर तापमानात पारा 15 अंशांवर नोंदवण्यात आला आहे.
मुंबईकर गारठले
मुंबईत दिवसा उष्णता आणि रात्री गारठा पाहायला मिळत आहे. रविवारी मुंबईचं किमान तापमान 18.9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल, हे या हंगामातील नीचांकी तापमान आहे. मुंबईत दिवसाचे तापमान 35.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. पुढील 5 दिवस दिवस आणि रात्रीच्या तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने चढउतार होत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईत हवामान कसं असेल?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबई उपनगराचे किमान तापमान 18.9 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेलं. शहरातील किमान तापमान 21.8 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. पुढील एक ते दोन दिवस मुंबईत रात्रीच्या वेळी थंडी आणि दिवसा उष्ण वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत 27 डिसेंबरपर्यंत दिवसाचे तापमान 34 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यातही हुडहुडी
राज्यात मराठवाड्यातही पारा चांगलाच घसरला आहे. मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये रविवारी सकाळी सर्वात कमी 11.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, हे महाबळेश्वरपेक्षा जवळपास चार अंश सेल्सिअस थंड आहे. पुण्यातही थंडीची तीव्रता वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील पाषाण येथे 9.7 अंश किमान तापमानाची नोंद झाली. डोंगराळ भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडी वाढली आहे. मैदानी भागातून येणाऱ्या थंड उत्तरेकडील वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या हवामानात बदल झाला आहे.
डिसेंबरअखेरपर्यंत थंडी कायम
अरबी समुद्रातील चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येत्या काही दिवसात राज्यासह देशाच पारा घसरणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ही थंडीची लाट वर्षअखेरपर्यंत कायम राहू शकते. थंडीचा जोर वाढल्याने आता शहरासह ग्रामीण भागातही लोक शेकोट्या पेटवून त्याचा आधार घेऊ लागले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक उबदार कपडे वापरताना दिसतात. रब्बी पिकांसाठी ही थंडी फायदेशीर आहे.