अंधश्रद्धेचा कळस! पैशांचा पाऊस पाडण्याचं सांगत वर्ध्यात युवतीचा अघोरी छळ
अघोरी पूजा करून लाख, दोन लाख नव्हे तब्बल 80 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचा दावा मांत्रिकाकरवी केला गेला. त्यासाठी युवतीला निर्वस्त्र करत घृणास्पद प्रकार केले गेले.

वर्धा : पैशांच्या लोभासाठी अनेक जण आजही अंधश्रद्धेला बळी पडतात. वर्धा जिल्ह्यातही पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा करण्यासोबतच गुप्तधनासाठी युवतीचा शारीरिक, मानसिक छळ केला गेला. यात पीडितेसोबत घृणास्पद प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अघोरी पूजा करून लाख, दोन लाख नव्हे तब्बल 80 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचा दावा मांत्रिकाकरवी केला गेला. त्यासाठी युवतीला निर्वस्त्र करत घृणास्पद प्रकार केले गेले. सातत्यानं होणाऱ्या या छळाला कंटाळून पीडिता घरून निघून गेली.
विशेष म्हणजे यामध्ये पीडित युवतीच्या आईनंही या अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याच पुढं आलं आहे. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करत बाळू मंगरूटकर आणि पीडितेचा नातलग असलेल्या एका व्यक्तिला अटक केली आहे.
युवतीची आई एका दुकानात काम करायची. तिथं ओळख झालेल्या महिलेनं मुलीची पूजा करत पैशाचा पाऊस पाडणारा मांत्रिक असल्याचं सांगितलं. तिथून या छळाला सुरुवात झाली.
युवतीला वर्ध्यासोबतच लगतच्या जिल्ह्यांतही नेण्यात आलं होतं. युवतीच्या शरीरात मुंजा म्हणजेच अतृप्त आत्मा सोडून हा पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष मांत्रिकाकडून दाखवण्यात आलं. या घटनेत पीडितेच्या कुटुंबातील व्यक्तिसह बाहेरील व्यक्तीही सहभागी असल्याचं पुढं आलंय.
हा प्रकार करताना कुवारा पेपर, विधवा पेपर, डीआर असे कोड बोलले जात होते. या घटनेत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे. चौकशीत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनही पोलिसांना मदत केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
