Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीच्या जागावाटपावर भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; फडणवीस, बावनकुळे दिल्लीत पोहोचले
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक आज (16 ऑक्टोबर) संध्याकाळी 6 वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयात होणार आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election : निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केलीअसून राज्यातील सर्व 288 जागांवर एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक आज (16 ऑक्टोबर) संध्याकाळी 6 वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयात होणार आहे.
या बैठकीला पीएम मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर सीईसी सदस्य उपस्थित राहणार आहेत.
पक्षाच्या बहुतांश जागा निश्चित
महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे, त्यात भाजपच्या सध्याच्या जागेवर चर्चा होणार आहे. मला वाटतं, आमच्या पक्षाच्या बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत. आधी विद्यमान जागांवर निर्णय घ्यायचा आणि नंतर उर्वरित जागांवर निर्णय घ्यायचा आहे.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपण काही गोष्टी शिकलो आहोत. मोदीजींनी भारताचा विकास करण्याचे वचन दिले आहे, असे म्हणत आम्ही निवडणूक लढवली. आम्ही विकसित भारतासाठी मते मागत राहिलो आणि काँग्रेस पक्ष खोटे बोलत राहिला. काँग्रेसने जनतेत संभ्रम निर्माण केला. ते म्हणाले की, 2014 साली भाजपने महाराष्ट्रात 260 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 122 जागा जिंकल्या. 2019 मध्ये 105 जागा जिंकल्या होत्या. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता.
मुख्यमंत्रिपद देताना आम्ही त्याग केला
दुसरीकडे, मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं पद, ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी त्याग केला, त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत शिंदेंनी मित्रपक्षांना झुकतं माप द्यावं असा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेंकडे आग्रह धरल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत महायुतीची जागावाटपाची चर्चा सुरू असून केंद्रीय मंत्री अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून हे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महायुतीतील जागावाटपावरून मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हा युक्तिवाद केल्याची माहिती महायुतीतील एका मोठ्या नेत्याने दिली.
इतर महत्वाच्या बातम्या