Maharashtra ST Bus Accident : एसटी बस अपघात: मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये द्यावेत, मुख्यमंत्र्यांचे एसटी महामंडळाला निर्देश
Maharashtra Bus Accident : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात झालेल्या अपघातातील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीकडून प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
ST Bus Accident : मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक 02572223180 आणि 02572217193 असा आहे.
बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाशी संपर्कात असून शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे असेही त्यांनी सांगितले.
अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाइन
अपघाताबाबत एसटी महामंडळाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने 022-23023940 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे.