सोलापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायावरून पोलीस आणि जिल्ह्यातील आमदार यांच्यातले वाद चिघळणार
गृहमंत्र्यांना याची माध्यमांच्या समोर सफाई देताना जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

सोलापूर : पोलीस यांची आदरयुक्त भीती समाजातील वाईट प्रवृत्तींना असणे ही गरजेची असते. मात्र पोलिसांची भीती जर लोकप्रतिनिधी आणि आमदारांना वाटू लागली असेल तर नक्कीच हा चिंतेचा विषय असतो. अशीच परिस्थिती सध्या सोलापूर जिल्ह्यात आलेली असून यावर तोडगा काढायला आलेल्या गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या समोर सोलापूर पोलिसांच्याबाबत जिल्ह्यातील आमदारांनी केलेले गंभीर आरोप राज्याच्या गृह विभागासाठी देखील धक्कादायक आहे .
गेल्या विधानसभा अधिवेशनात मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे यांनी अवैध व्यवसायाबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याला योग्य उत्तर न मिळाल्याने खोटी माहिती देणाऱ्यांवर हक्कभंग आणण्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यानंतर चौकशीचे आश्वासन दिलेल्या गृहराज्यमंत्र्यांना आपल्या आश्वासनाची आठवण अर्थसंकल्प अधिवेशन जवळ आल्यावर झाली. यासाठी त्यांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक अकलूज येथे बोलावली आणि यासाठी राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी वेळापूर येथून येताना याचा फटका खुद्द गृहमंत्र्यांना बसला. दोन दिवसापूर्वी निर्घृण हत्या झालेल्या शेतमजुरांचे कुटुंबीयांनी गृहराज्यमंत्र्यांना अडवले आणि आपली परिस्थिती सांगितली. यानंतर शंभूराजे देसाई यांनी हा खून झालेल्या वेळापूर पोलीस ठाण्याला भेट देऊन अधिकाऱ्यांची उलट तपासणी घेतली.
मात्र ज्यावेळी जिल्ह्यातील आमदारांची बैठक सुरु झाल्यावर आमदारांनी जिल्ह्यातील पोलीस विभागावर अतिशय गंभीर आरोप केले. गृहमंत्र्यांना याची माध्यमांच्या समोर सफाई देताना जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा योग्य सन्मान करणे आवश्यक असून त्याबाबत स्पष्ट आदेश जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिल्याचेही गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले .
आमदार म्हणाले की, प्रशासन त्यांच्यासमोर नम्रपणे काम करते अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत धक्कादायक आहेत . बार्शी येथे एक मटका चालवणारा रोज 50 लाखांचा व्यवसाय करतो असा गंभीर आरोप केला. आपण तीन वेळा तक्रारी दिल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवैध व्यावसायिकांचे जबाब नोंदवत पोलिसांना हफ्ते देता का असे विचारल्याचेही राऊत यांनी सांगितले. एखादा आमदार अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी आग्रह करू लागताच माहिती अधिकाराचे कार्यकर्ते आमदारांच्या मागे लावले जातात आणि ब्लॅकमेल करायचे काम पोलीस अधिकारी करतात असा आरोप आमदार राऊत यांनी केला.
बार्शीतील फटे प्रकरणात आपण आधीच माहिती देऊनही अधिकाऱ्यांनी कारवाई करण्या ऐवजी त्याच्याशी संबंध ठेवत असेल तर गोरगरीब जनतेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत राहणार असे सांगितले. बार्शीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार होत असून दिवस ढवळ्या दरोडे चालत असून आता मुख्यमंत्र्यांनीच यात लक्ष घालून कारवाई करावी असे आवाहन केले. या राज्यात जर आमदार सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल करत जर एखादा सर्वसामान्य नागरिक अवैध व्यवसायावर आवाज उठवू लागला तर पोलीस त्याचेवर मोक्का लावतील असे उद्विग्न प्रतिक्रिया दिली. गृहराज्यमंत्री देसाई यांनी उद्यापासून तुम्हाला परिस्थितीत बदल दिसेल असे सांगितले असून आम्ही त्यावर विश्वास ठेवतो पण असा बदल झाला नाही तर विधानसभा अधिवेशनात ही परिस्थिती सदनासमोर मांडणार असल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले .
आपण गेल्या अधिवेशनात अवैध व्यवसायाबाबत तक्रार केल्यावर आता दुसऱ्या अधिवेशनापूर्वी गृहमंत्री बैठक घेत असले तरी तक्रारीनंतर एकही अवैध व्यवसाय अजून बंद झाला नसल्याचे आमदार समाधान अवताडे यांनी सांगितले . फारतर वेळ घालवण्यासाठी मंदिरात काही वृद्ध पट्टे खेळात असतील तर त्यांचेवर कारवाईचा दिखावा केला जातो असा आरोपही अवताडे यांनी केला .
राज्यात सर्वत्र वसुली जोरात सुरु असून मंदिराबाहेर बसलेला भिकारी सोडला तर सगळ्यांकडून हफ्ते घेतले जात असल्याचा टोला आमदार राम सातपुते यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती खूपच गंभीर असून गृहराज्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हे अवैध व्यवसाय बंद न झाल्यास आम्ही येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव आणण्यासाठी विरोधी पक्षनेत्याना सांगणार असल्याचेही आमदार सातपुते यांनी सांगितले.
एकंदर पोलिसांच्या विषयी इतक्या टोकाच्या तक्रारी समोर आल्यानंतर तातडीने एक अवैध व्यवसाय विरोधात मोठी मोहीम हाती घेण्याचे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले असून अनेक सक्त सूचना देखील अधिकाऱ्यांना दिले आहेत . काही असले तरी अवैध व्यवसाय आणि काही मुजोर अधिकाऱ्यांच्या वागणुकीचा फटका थेट आमदारांना बसल्यानंतर आता सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या पोलिसांच्या वागणुकीतही नक्की बदल घडेल अशी अशा ठेवायला हरकत नाही . पण आज गृहराज्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर यामध्ये सुधारणा झाली नाही तर मात्र आमदार आणि पोलीस यांच्यातील वाद पुन्हा विधानसभा अधिवेशनात पोहचेल हे मात्र नक्की























