उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतलेत हे समजेल; सुहास कांदेंचा खळबळजनक आरोप
Maharashtra Political News Updates: उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा, म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतले हे समजेल, असा खळबळजनक आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.
Suhas Kande on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नार्कोटेस्ट (Narco Test) करा म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतले हे कळेल, असा घणाघाती आरोप शिवसेना (Shiv Sena) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी नाही, तर श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांची चौकशी होऊ नये म्हणून राजीनामा दिला, असा खळबळजनक दावा देखील सुहास कांदे यांनी केला आहे. हे सगळं सत्य बाहेर यावं म्हणूनच उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करणं गरजेचं आहे, असंही कांदे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंची काल (रविवारी) मालेगावमध्ये सभा पार पडली. या सभेमध्ये ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेल्या सर्वच आमदारांचा समाचार घेतला. तसेच, अनेक गंभीर आरोप करत टीकास्त्रही डागलं. यासंदर्भात शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी एबीपी माझाशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचं उदाहरण देताना ठाकरेंनी आमदार सुहास कांदे यांच्यावरही प्रहार केले. यासंदर्भात आणि एकंदरीतच ठाकरेंच्या मालेगावमधील सभेवर टीका करताना सुहास कांदे म्हणाले की, "ठाकरेंची सभा फक्त टोमण्यांची सभा होती. या सभेत तरुणांना कोणतंही नेतृत्त्व नव्हतं. तसेच तरुणांना, शेतकऱ्यांना दिशा देणारी सभा नव्हती. सभा पाहून बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मला उद्धव ठाकरेंची दया आली."
आम्ही हिंदुत्वासाठी सरकार बदललं : सुहास कांदे
50 खोक्यांसंदर्भातील आरोपांवर बोलताना कांदे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे की, आपण आता भावनेचं राजकारण बंद करावं. मी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान करतो की, आम्ही एक रुपया घेतला असेल तर आमची नार्को टेस्ट करा. ती जाहीरपणे कॅमेरे लावून करा. आम्ही खोका सोडा एक रुपया घेतला असेल, तर सत्य समोर येईल. आम्ही हिंदुत्वासाठी सरकार बदललं. ज्या बाळासाहेबांना शिव्या दिल्यात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. मग आम्ही कोणाकडे पाहायचं? ज्यांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवली. ज्यांना आम्ही निवडणुकीत पराभूत केलं. त्यांच्यासोबत बसायचं आणि ज्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली, त्यांच्या विरोधात बसायचं, हे उद्धव ठाकरेंना कसं आवडलं हे आम्हाला माहीत नाही. म्हणूनच आम्ही उद्धव ठाकरेंना सोडून गेलो."
पाहा व्हिडीओ : Suhas Kande On Uddhav Thackeray : मी 50 खोके घेतले अस म्हणत आहेत तर माझीही नार्कोटेस्ट करा
...तर मी संन्यास घेईल; सुहास कांदेंचं ठाकरेंना जाहीर आव्हान
"उद्धव ठाकरेंना माझं जाहीर आव्हान माझीही नार्को टेस्ट कराच, पण मी 10 कॉन्ट्रॅक्टर्सची नावं सांगतो, त्यांच्याकडून तुम्ही किती पैसे घेतले, त्याचीही टेस्ट होऊ द्यात. मी फक्त चारच प्रश्न विचारतो, त्यांनी मला शंभर प्रश्न विचारावेत. माझ्या नार्को टेस्टमध्ये मी सरकार बदलीसाठी एक रुपया जरी घेतल्याचं आढळलं तर मी राजकारणातून संन्यास घेईल."
"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला? हे जनतेला माहीत नसेल पण आम्हाला माहित आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा श्रीधर पाटणकरांची चौकशी थांबवण्यासाठी दिला. त्यांच्यावरची अटकेची तलवार होती, जर यांना अटक झाली तर त्यांच्या चौकशीतून संशयाची सुई कोणाकडे जाईल, याच भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला.", असं सुहास कांदे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "यासाठी माझी नार्को टेस्ट करा आणि उद्धव ठाकरेंचीही नार्को टेस्ट करा. जर ते म्हणाले मी पाटणकरांसाठी राजीनामा दिलेला नाही, तर मी राजकारणातून संन्यास घेईल."