(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Guwahati: शिंदे गटाचे पुन्हा 'चलो गुवाहटी', 'या' कारणासाठी करणार दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे. सर्व आमदार सोबत घेऊन शिंदे पुन्हा गुवाहाटी येथे जाणार आहे.
मुंबई : मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणाच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे शिंदे यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारही गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे. सर्व आमदार सोबत घेऊन शिंदे पुन्हा गुवाहाटी येथे जाणार आहे. दौऱ्याची तारीख निश्चित नसली तरी पुढचा आठवड्यात दौरा होण्याची शक्यता आहे. या दौऱ्याची तयारी करण्यासाठी काही पदाधिकारी देखील गुवाहाटीला रवाना झाले आहेत.
दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस कमिशनर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांना भेटणार आहेत. या दौऱ्यात कामाख्या देवीच्या मंदिरात विशेष पूजेचे नियोजन देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्योसबत शिंदे गटाचे सर्व आमदार देखील अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौऱ्याबाबची माहिती दिली अयोध्या दौऱ्याअगोदर शिंदे गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र, या दोन्ही धार्मिकस्थळी जाऊन ते सहकाऱ्यांसोबत दर्शन घेतील, असे सांगण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंडखोरी केली आणि तब्बल 40 शिवसेना आमदारांना घेऊन सत्तेबाहेर पडले. त्यांच्यासह मित्रपक्ष आणि अपक्ष आमदारांनी देखील सत्तेतून काढता पाय घेतला होता. हे सर्व आमदार गुवाहाटीच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. शिंदे गटाच्या या सर्व 50 आमदारांचा गुवाहाटी दौरा चांगलाच गाजला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतरच ते पुन्हा राज्यात आले होते.
दरम्यान, गुवाहाटी दौरा चांगलाच गाजला होता. आता पुन्हा गुवाहटी दौऱ्याचा विषय चर्चेत आला आहे. तोही एकनाथ शिंदे यांच्यामुळं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच गुवाहटी दौऱ्यावर जाणार असल्यानं या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदेसह आमदारांनी शक्तिपीठ असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि तिथं पूजाही केली होती. कामाख्या देवी ही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि तिचा प्रसाद भक्तांनी इच्छित फळ देतो असं मानलं जातं. त्यावेळी संजय राऊत यांनी कामाख्या देवीच्या दर्शनावरून टीका देखील होती.