वर्षभरात 75 हजार शासकीय रिक्त पदांची भरती; मंत्री शंभूराज देसाईंची मोठी घोषणा
Recruitment : देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षात भरती प्रक्रिया काही प्रमाणात मंदावली होती, असं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलं आहे.
Maharashtra Recruitment News : राज्यात शासनाच्या 29 प्रमुख विभागांमध्ये दोन लाख 193 जागा रिक्त आहेत. यातील राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100 टक्के पदभरती (Maharashtra Recruitment) करणार तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता 50 टक्के पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली. शासनाच्या 29 प्रमुख विभागांमध्ये दोन लाख 193 जागा रिक्त असल्याबाबतची लक्षवेधी विधानपरिषदेत सादर करण्यात आली.
देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती
मंत्री देसाई म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षात भरती प्रक्रिया काही प्रमाणात मंदावली होती मात्र आता ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिमरित्या मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे 50 टक्के भरण्यात येणार आहेत तर राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100 टक्के पदभरती करणार आहोत, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिक दुर्बल गटात आरक्षित पदांवर नियुक्ती
एमपीएससीतर्फे आकृतीबंधानुसार ही पदं भरण्यात येतील. तसंच जिल्हा निवड समित्यांमार्फत भरण्यात येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ५० टक्के पदंही भरण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलंय. यासोबतच मराठा समाजातल्या तरुणांसाठीही महत्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिक दुर्बल गटात आरक्षित पदांवर नियुक्ती मिळणार आहे. तसंच भरती प्रक्रियेत अनियमितता केलेल्या खासगी कंपन्यांचा या प्रक्रियेत समावेश होणार नसल्याचंही शंभूराज देसाई यांनी सांगितंलय.
त्यांनी सांगितलं की, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-ब (अराजपत्रित), गट – क व गट – ड संवर्गातील नामनिर्देशनच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत जिल्हा निवड समिती, प्रादेशिक निवड समिती आणि राज्यस्तरीय निवड समिती स्थापन करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगास 18 ऑगस्ट 2022 पर्यंत विविध पदांच्या भरतीकरिता प्राप्त झालेल्या गट-अ, गट-ब व गट-क मधील एकूण 11026 पदांच्या मागणीपत्राच्या अनुषंगाने राज्य लोकसेवा आयोगाकडून आतापर्यंत 10 हजार 020 पदांकरिता जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत तसेच आतापर्यंत आयोगाकडून प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने पार पाडण्यात आलेल्या परीक्षा प्रक्रियेअंती आतापर्यंत 3 हजार पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे उर्वरीत पदांकरिता परीक्षा प्रक्रिया आयोगाकडून राबविण्यात येत असल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली.
राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती
राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच विधानसभेत दिली. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.