Barsu Refinery: रिफायनरीच्या मुद्द्यावर ठाकरेंविरोधात महायुती आक्रमक; उद्धव यांच्या दौऱ्यावेळी काढणार प्रत्युत्तर मोर्चा
Barsu Refinery: बारसू रिफायनरीच्या समर्थनासाठी भाजप-शिवसेना शिंदे गट 6 मे रोजी मोर्चा काढणार आहेत. याच दिवशी उद्धव ठाकरे बारसूमध्ये असणार आहेत.
Barsu Refinery: रत्नागिरीतील बारसू सोलगाव (Barsu Refinery) येथील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून राजकारण आणखी पेटणार आहे. रिफायनरीच्या मुद्यावरून (Ratnagiri Refinery)आता शिवसेना-शिंदे गट-भाजपने थेट आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. उद्धव यांच्या दौऱ्याच्या दिवशी रत्नागिरीत रिफायनरीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे रिफायनरी समर्थक हे देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली संमतीपत्रे देणार आहेत.
मागील काही दिवसांपासून रिफायनरीच्या मुद्यावरून रत्नागिरी आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. बारसू-सोलगावमध्ये रिफायनरीच्या प्रस्तावित जागेवर माती सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांनी मोठा विरोध केला होता. स्थानिक ग्रामस्थांचा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तर, रिफायनरीविरोधी संघटनेच्या काही नेत्यांना हद्दपार करण्यात आले होते. तर, काहींना अटकही करण्यात आली होती.
प्रशासन आणि पोलिसांकडून होणाऱ्या दडपशाहीविरोधात भाजप, शिवसेना शिंदे गट वगळता इतर पक्षांनी आवाज उठवत स्थानिकांची भूमिका समजून घेण्याचे आवाहन सरकारला केले होते. त्यानंतर
एक मे रोजी मुंबईत पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण बारसू येथे जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर कोकणातील राजकीय वातावरण आणखीच तापले.
उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या दिवशी भाजप-शिवसेना शिंदे रिफायनरीच्या समर्थनात मोर्चा काढणार आहे. बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुतीचा प्रत्युत्तर मोर्चा रत्नागिरी हेलिपॅडपासून सुरू होणार असल्याची चर्चा आहे. याच ठिकाणी उद्धव ठाकरे उतरणार असल्याचे म्हटले जात आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपचे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजप नेते प्रमोद जठार हे रिफायनरीच्या समर्थनात निघाणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. कोकणाच्या विकासासाठी, रोजगारासाठी हा प्रकल्प आवश्यक असल्याची भूमिका आमदार नितेश राणे यांनी मांडली.
On the 6th may a huge morcha in the support of Green Refinery in Barsu Ratnagiri with all our leaders Uday Samantji ,Nilesh Rane ji , Pramod Jattar ji n other party leaders of Mahayuti.
— nitesh rane (@NiteshNRane) May 3, 2023
Kokan wants development n we won’t allow anyone to stop it ! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
या मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे गट व शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते आमनेसामने उभे ठाकणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
रिफायनरी प्रकल्पा विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बारसू येथे येत आहेत. यावेळी रिफायनरी समर्थक देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संमती पत्रे सादर करणार आहेत. रिफायनरी प्रकल्पासाठी बारसु येथे माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आली असून या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 6 मे रोजी बारसू येथे येत आहेत. यावेळी रिफायनरी प्रकल्पाला राजापूर तालुक्यात असलेले समर्थन ठाकरे यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी समर्थक ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
यामध्ये राजापुरातील विविध 51 संघटना, ग्रामपंचायतीचे सरपंच, जमीन मालक, बागायतदार, व्यापारी असे हजारो समर्थक उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी नाणारसह बारसू परिसरातील शेतकरी, जमीनदार प्रकल्पासाठी जमिनीची संमतीपत्रे ठाकरे यांना सादर करणार आहेत.