Gondia News :आदिवासी विकास महामंडळाचं हजारो क्विंटल धान खराब; गोडाऊन नसल्याचा धान खरेदीला फटका
Gondia News : आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर अनेक ठिकाणी गोडाऊन नसल्यामुळे हजारो क्विंटल धान हे खराब झालं आहे. आता ही तूट कुठून भरून काढावी, असा प्रश्न केंद्र अध्यक्षाकांना पडला आहे.
Gondia News गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाद्वारे धान खरेदी करण्यात येते. गोंदिया जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळाची 41 केंद्र कार्यरत असून या 41 केंद्रावर सुमारे 6 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. परंतु गेल्या सहा महिन्यापासून राईस मिलर यांनी धानाची उचल न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हजारो क्विंटल धान हे खराब झालं आहे. कारण आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर अनेक ठिकाणी गोडाऊन नसल्यामुळे हे धान खराब झालंय आणि आताही तूट कुठून भरून काढावी, असा प्रश्न आता केंद्र अध्यक्षाकांना पडला आहे.
शासनाने क्विंटल मागे 1 किलो तूट ही शासनाद्वारे दिले जाते. परंतु आता हजारो क्विंटल धानाची उचल न केल्यामुळे या धानाला फटका बसला आहे. तर हे खराब झालेल्या धानाची भरपाई कुठून करणार, असा प्रश्न आता केंद्र अध्यक्षाकांना सतावत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र संचालकाची कमिशन सुद्धा मिळालं नसल्यामुळे शासनास केंद्र संचालकांनी विनंती केली आहे की, लवकरात लवकर कमिशन द्यावे, जेणेकरून तुटीच्या संदर्भाने योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा आता केंद्र अध्यक्ष करीत आहे.
इलेक्ट्रॉनिक वजन काट्यात चिप लावून भंगाराची हेराफेरी
चंद्रपूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात इलेक्ट्रॉनिक वजन काट्यात चिप लावून भंगाराची हेराफेरी केल्याची घटना पुढे आली आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (सरकारी कोळसा कंपनी) च्या दुर्गापूर कोळसा खाणीतील हा प्रकार आहे. तर यात इलेक्ट्रॉनिक काट्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या खाजगी कंपनीचे 2 कर्मचारी आणि वेकोलीचे 2 कर्मचारी अशा एकूण 4 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गापूर कोळसा खाणीतून फैज ट्रेडर्स या कंपनीला भंगार नेण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र इलेक्ट्रॉनिक वजन काट्यात चिप लावून भंगाराच्या वजनात हेराफेरी करण्यात येत होती. दरम्यान, फैज ट्रेडर्सला फायदा पोहचविण्यासाठी चिप लावण्यात आल्याचा संशय यातून व्यक्त केली जातेय. या प्रकरणात वेकोलीला कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक संशय आता व्यक्त केला जात आहे.
नुकसानग्रस्त सोयाबीनचे पंचनामे करून मदत द्या
परभणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये यंदा पाऊस कमी झाल्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव सोयाबीनवर झालाय, ज्यामुळे सोयाबीनचे उत्पादन 50% पेक्षा कमी होणार असल्याने तात्काळ या नुकसानग्रस्त सोयाबीनचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आलीय. यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर सोयाबीनचे खराब झालेली झाड आणुन टाकत आंदोलन केले आहे. जर लवकरात लवकर या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
हे ही वाचा