Ajit Pawar : नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा जीव वाचवणं हेच प्रथम कर्तव्य, वेळप्रसंगी 'आऊट ऑफ द वे' जाऊन काम करावं लागेल : अजित पवार
नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी व्यक्त केलं.
Ajit Pawar : अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी नियमाचा बाऊ न करता, वेळ पडली तर प्रसंगी, 'आऊट ऑफ द वे' जाऊन काम करावे लागले. त्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी व्यक्त केलं. जनहिताच्या प्रत्येक कार्यात शासन तुमच्यासोबत असल्याचे पवार म्हणाले. आपत्ती निवारण, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देखील यावेळी अजित पवार यांनी दिली.
राज्यस्तरीय विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत अजित पवार बोलत होते. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीबाबत सतर्क राहून काम करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. यावेळी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य मुख्य सचिव नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, आपत्ती नियंत्रण कक्षाचे संचालक आप्पासो धुळाज, आपत्ती नियंत्रण कक्षाचे उपसचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल आमदार संजय कुटे उपस्थित होते.
आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही
पूरामुळे गावात घरात, रस्त्यावर गाळ साचला असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी ‘राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधी’ तसेच जिल्हा परिषदेतील निधीचा उपयोग करावा. प्रत्येक जिल्ह्याला दिलेला 30 लक्ष रुपयांचा आगाऊ निधी वापरावा. निधी कमी पडल्यास तातडीने निधीची मागणी करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
नदी,नाल्यांमधील अतिक्रमण काढावे
राज्यात अनेक भागात नदी, नाले, ओढ्यात अतिक्रमण झाले आहे. नदी, नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी नदी, नाल्यातील अतिक्रमण काढण्याचे काम प्राधान्याने व कठोर भूमिका घेऊन पार पडावे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. नदी, नाल्यातील गाळ काढण्याचे काम करण्यासाठी कंत्राटदारांची यंत्रसामुग्री व प्रशासनाकडून डिझेलची व्यवस्था करावी. 15 सप्टेंबरपर्यंत ही मोहीम पूर्ण करावी. तसेच गाळ काढल्यानंतर तो पुन्हा नदी, नाल्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे पवार म्हणाले.
दरडप्रवण भागातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करुन आराखडा तयार करा
दरडप्रवण भागात ईरशाळवाडी, तळीये सारख्या घटना घडू नयेत, यासाठी अशा डोंगरी-दुर्गम भागातील दरडप्रवण आदिवासी तांडे, पाडे यांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अशा धोकादायक गावांची माहिती सर्वेक्षणाद्वारे एकत्रित करावी. पुनर्वसन करण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था, गावकऱ्यांची उपजिविका या सर्व बाबींचा विचार करून आराखडा तयार करण्याच्या सूचना सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. तसेच अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या: