(Source: Poll of Polls)
Maharashtra Rain : मुंबईसह कोकण मराठवाड्यात मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत देखील जोरदार पाऊस पडत आहे.
Maharashtra Rain : सध्या राज्यात काही भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. मुंबईसह (Mumbai) परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तसेच मराठवाडा आणि कोकण पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, 11 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पुढील दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
कोल्हापूर पाऊस
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या दमदार पावसाने पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडली आह. राजाराम बंधारा पाणी पातळी 33 फूट 2 इंच इतकी आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, दुधगंगा धरणाचे सांडव्यावरील 5 वक्राकार दरवाजे उघडले असून, त्यातून 423 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. तसेच पॉवर हाऊसमधून 1 हजार क्युसेक्स असा एकूण 1 हजार 423 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे.
मराठवाडा पाऊस
मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आणखी दोन दिवस पावसाचा मराठवाड्यात मुक्काम असणार आहे. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं आधीच ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली असताना, आता पुन्हा दोन दिवस पाऊस बरसणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज नांदेड, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर 10 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आजपासून पुढील दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
बीड जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळं नदी नाल्यातून पाणी वाहताना पाहायला मिळाले. सोबतच लातूर जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. दुपारच्या सुमारास तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी असल्याचे चित्र होते.