(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस, बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. जाणून घेऊयात पावसाबद्दल सविस्तर माहिती.
Maharashtra Rain News : सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. मात्र, काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी पावसाअभावी शेतीची कामं देखीळ खोळंबल्याचं चित्र दिसत आहे. तर ज्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय त्या ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. जाणून घेऊयात पावसाबद्दल सविस्तर माहिती.
या भागात आज पडणार मुसळधार पाऊस
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुंताश भागात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज राज्यातील कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु
आज सकाळपासून गोंदिया जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यानं जून महिन्याच्या अखेरपर्यंत नं झालेली भात पिकांची लागवड आता जोमानं होणार आहे. तर, रिपरिप सुरु असलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षीच्या कडक उन्हामुळे प्रमुख जलाशयांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. तर यावर्षी जून महिन्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. धरण, नदी आणि नाल्यांमध्ये पाणी साचले नाही. परिणामी, गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत. गतवर्षीच्या तुलनेत सद्यःस्थितीत प्रकल्पांमध्ये फार कमी पाणीसाठा आहे. गोंदिया जिल्ह्यात सरासरी 1245 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद होते. मात्र, गेल्या काही वर्षात पावसाची सरासरी कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. यावर्षीही जून महिना कोरडाच गेल्याने सद्यस्थितीला गोंदिया जिल्ह्यातील मुख्य जलाशयांमध्ये 17 टक्के तर मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 30 टक्के जलसाठा शिल्लक आहे.
नाशिक जिल्ह्यात खराब वातावरणामुळे फळबागांना आणि भाजीपाला पिकांना फटका
नाशिक जिल्ह्यात पाऊस वेळेत नसल्यामुळे आणि पावसाळ्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. खराब वातावरणामुळं फळबागांना आणि भाजीपाल्याला रोगराईचा फटका बसत आहे. सध्या पिकांचं उत्पादन कमी झाल्यामुळं दरात वाढ होताना दिसत आहे. टोमॅटोची दर प्रति किलो 80 ते 100 किलो रुपये दराने वाढला आहे.
महत्वाच्या बातम्या: