Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा कहर, 76 जणांचा मृत्यू, शेकडो गावं बाधित तर 90 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
Maharashtra Rain Flood Landslide collapse update : राज्यात पावसाचा कहर सुरु असून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 9 जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झाले आहेत.
Maharashtra Rain Flood Landslide collapse update : राज्यात पावसाचा कहर सुरु असून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 9 जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झाले आहेत. राज्यात पावसामुळं दरडी कोसळून तसेच पुरात बुडून एकूण 76 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. दुर्घटना घडलेल्या तसेच महापूर आलेल्या ठिकाणी एनडीआरएफ, लष्कराच्या मदतीने बचाव कार्य सुरु असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
पाटणमधील आंबेघर गावात काल भूस्खलन, 16 बेपत्ता, अखेर आज एनडीआरएफची टीम पोहोचली, बचावकार्य सुरु
राज्यात अतिपावसामुळं कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे हे जिल्हे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहेत. राज्यभरात 890 गावं बाधित झाली असून यात अनेक घरांचं नुकसान झालं आहे. आतापर्यंत एकूण 76 जणांना मृत्यू झाला असून 59 लोकं अद्याप बेपत्ता आहेत तर 38 जण जखमी झाले आहेत. राज्यात 16 घरांचं पूर्ण नुकसान झालं आहे तर 6 घरांचं अंशत: नुकसान झालं आहे. 90 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
3 ठिकाणी दरडी कोसळल्या
तळीये मधलीवाडी (ता. महाड)
साखरसुतारवाडी
केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले असून दुपारी दीडच्या दरम्यान ते दुर्घटनाग्रस्त तळीये गावी पोहचून पाहणी करतील. आज सकाळी त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून पूर परिस्थिती व मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली.
असं सुरु आहे मदत कार्य
राज्यात विविध ठिकाणी एनडीआरएफच्या एकूण 25 तुकड्या बचावकार्य करत आहेत. यात मुंबई 2, पालघर 1, ठाणे 2, रायगड 1, रत्नागिरी 6, सिंधुदुर्ग 2, सांगली 2, सातारा 3, कोल्हापूर 4, पुणे 2 अशा तुकड्या कार्यरत आहेत. भुवनेश्वरहून मागविलेल्या 8 तुकड्या या कोल्हापूर 2, सातारा 1, सांगली 2 इथे तैनात केल्या जातीत तसेच 2 तुकड्या पुणे येथे राखीव असतील. सोबतच तटरक्षक दलाच्या 3 , नौदलाच्या 7, लष्कराच्या 3 तुकड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड येथे कार्यरत आहेत. एसडीआरएफच्या नागपूरसाठी 2 आणि या रायगड जिल्ह्यासाठी 2 अशा 4 तुकड्या कार्यरत आहेत.
महाड येथील परिस्थिती :
अतिवृष्टीमुळे सावित्री नदीचे पाणी वाढून महाड आणि पोलादपूर येथे पूर आला. सावित्री नदीवरील पूल मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्याने बचाव पथकांना वेळीच पोहोचणे अवघड झाले.
एनडीआरएफच्या जवानांना हवाईमार्गे दुर्घटना स्थळी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुरुवातीला अतिशय खराब हवामानामुळे ते उतरू शकले नाहीत, मात्र नंतर त्यांनी बचाव कार्य सुरु केले आणि माणगाव येथे बचाव केंद्रे सुरु करण्यात आली.
2 कोटी रुपये निधी
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपये देण्यात आले असून पाउस आणि पाणी ओसरल्याने मदत कार्यास वेग देण्यात आला आहे.