Shiv Sena Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांना धक्का; 'या' दोन नेत्यांवर आरोप करत निकटवर्तीय अमेय घोले शिंदे गटात
Shiv Sena Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मुंबईतील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे.
Shiv Sena Aaditya Thackeray: शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मुंबईतील माजी नगरसेवक अमेय घोले (Amey Ghole) यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच अमेय घोले यांनी युवासेना कोअर समितीचा राजीनामा दिला होता.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड झाल्यानंतर अनेक नगरसेवक, खासदार, आमदार आणि यांच्यासोबतच कार्यकर्तेही ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाले. काही महिन्यांपूर्वी अमेय घोले हे युवा सेनेच्या कोअर टीम सदस्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक अमेय घोले हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर आज अमेय घोले यांनी आदित्य ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेय घोले यांनी काय म्हटलं?
अमेय घोले यांनी आदित्य ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, तुमच्यामुळे राजकारणात आलो. युवासेनेच्या माध्यमातून तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडली. गेली 13 वर्ष अंत्यत प्रामाणिकपणे काम केले. वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करताना श्रद्धा जाधव आणि सूरज चव्हाण यांनी कामात वारंवार अडथळे आणले. त्यामुळे काम करताना खूप त्रास झाला. याबाबत तुम्हाला वेळोवेळी माहितीदेखील दिली. संघटनेतील मतभेद दूर व्हावे यासाठी मी खूप प्रयत्न केला. मात्र, यावर तोडगा काढण्यात आला नाही. आज जड अंत:करणाने युवासेना सोडत असून कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.
जय महाराष्ट्र !!! @AUThackeray 🙏 pic.twitter.com/tYl9gk1P5J
— Amey Ghole (@AmeyGhole) April 17, 2023
गणेशोत्सवापासून चर्चांना उधाण
अमेय घोले हे ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा गणेशोत्सवापासून सुरू झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमेय घोले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला रात्री उशिरा भेट दिली होती. त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी, मी पदाधिकारी असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भेटीसाठी आले होते. राज्यातील राजकीय संस्कृतीचा भाग म्हणून मी त्यांचे स्वागत केले असल्याचे घोले यांनी सांगितले होते. शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांच्या संपर्कात घोले असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.