Maharashtra Local Body Election: नवीन वर्षात मुंबई, ठाणे, औरंगाबादसह 24 महापालिकांच्या निवडणुका? प्रभाग रचना करण्याचे सरकारचे पालिकेला आदेश
Maharashtra Local Body Election: मुंबई, ठाणे, औरंगाबादसह 24 महापालिका निवडणुकांमध्ये मार्च महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने महापालिकांना प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
Maharashtra Local Body Election: मुंबई (BMC), ठाणे (TMC), नवी मुंबई (Navi Mumbai), औरंगाबादसह (Aurangabad Municipal Corporation) राज्यातील 24 महापालिकांच्या प्रभाग रचना नव्याने करण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. नगरविकास खात्याने याबाबतचा आदेश काढला आहे. लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करण्यात येणार आहे. नगरविकास खात्याच्या आदेशामुळे आता राज्यात नवीन वर्षातील सुरुवातीच्या महिन्यांमध्येच महापालिका निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे.
राज्यातील 24 महापालिकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. कोरोना आणि इतर कारणांनी महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आता या निवडणुकीची सरकारच्या पातळीवर तयारी सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. मुदत संपलेल्या आणि नजीकच्या काळात मुदत संपत असलेल्या महापालिकांची प्रभाग रचना 2011 च्या जनगणनेनुसार करण्यासाठीची तयारी सुरू करण्यात यावी अशी सूचना नगरविकास खात्याने केली आहे.
अशी असणार प्रक्रिया
महापालिका नगरविकास खात्याच्या सुचनेनुसार, नवीन प्रभाग रचना झाल्यानंतर आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर निवडणूक आयोग प्रभाग रचना जाहीर करून सूचना आणि हरकती मागवेल. या सूचना, हरकती नोंदवण्यासाठी 15 दिवसांची मुदत असण्याची शक्यता आहे. त्यानंतर जनसुनावणी होईल. त्यानंतर प्रभाग आरक्षण सोडत आणि मतदारयादी अंतिम करण्यात येणार आहे. या सगळ्या गोष्टींसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे जाणकार सांगतात.
न्यायलयीन प्रक्रियेचे काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाबाबतची सुनवणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत प्रभागांची संख्या वाढवण्यात आली होती. मुंबई महापालिकेत 227 ऐवजी 236 इतकी प्रभाग संख्या झाली होती. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने याला स्थगिती देऊन मुंबई महापालिकेत पुन्हा 227 प्रभाग केले. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे कोर्टातील प्रकरणांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोणत्या महापालिकेत प्रभागरचना?
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नांदेड-वाघाळा, लातूर. परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर या महापालिकांची मुदत संपली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: