(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMC CAG: कॅगकडून मुंबई महापालिकेतील व्यवहाराची चौकशी सुरू; अधिकाऱ्यांकडे मागितली महत्त्वाची कागदपत्रे
BMC CAG: कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या 12 हजार कोटींच्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून सुरू करण्यात आली आहे.
BMC CAG: मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटींच्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून सुरू करण्यात आली आहे. आज कॅगचे आठ ते 10 अधिकारी मुंबई महापालिकेच्या (BMC) मुख्यालयात दाखल झाले. विविध विभागांच्या व्यवहारांच्या कागदपत्रांची त्यांनी मागणी केली असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी राज्य सरकारने कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या व्यवहाराची कॅगकडून (CAG) चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू आहे.
कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग (कंट्रोल ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी निविदा प्रक्रिया न राबवता कंत्राटे, वस्तू खरेदी करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या जवळपास 10 खात्यातून झालेले व्यवहार कॅगच्या रडारवर असणार आहे.
आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कॅगचे पथक पालिका मुख्यालयात दाखल झाले होते. या दरम्यान कॅगच्या अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी मुंबई महापालिकेचे काही अधिकारीदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर कॅगच्या पथकाने मुंबई महापालिकेच्या अकाउंट्स विभागात जाऊन व्यवहाराची माहिती मागितली. त्या व्यवहारांचे काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
28 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यानच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून करण्यात येणार आहे. या दरम्यानच्या व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता. अखेर विधीमंडळ अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या व्यवहाराची चौकशी कॅगमार्फत सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
कॅगमार्फत होणारी चौकशी ही तत्कालीन ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर, 'कॅग' मार्फत होणारी चौकशी राजकीय सूडबुद्धीने केली जाणार नसून निष्पक्षपाती आणि पारदर्शक पद्धतीने ही चौकशी होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.
महापालिकेचे कोणते व्यवहार रडारवर ?
> कोरोनाकाळात विविध बाबींवर खर्च झालेले 3538.73 कोटी
> दहिसर येथे अजमेरा यांच्या भूखंडाची 339.14 कोटींना पालिकेने केलेली खरेदी
> चार पुलांच्या बांधकामावर झालेला 1496 कोटींचा खर्च, कोरोनाकाळात तीन रुग्णालयांत करण्यात आलेली 904.84 कोटींची खरेदी
> शहरातील ५६ रस्त्यांच्या दुरुस्तीवरील 2286.24 कोटींचा खर्च
> सहा सांडपाणी प्रकल्पांवरील 1084.61 कोटींचा खर्च
> घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांवरील 1020.48 कोटींचा खर्च,
> तीन मलनि:सारण प्रक्रिया केंद्रासाठी 1187.36 कोटींचा खर्च