सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणीची शक्यता कमी, आता सुनावणी नव्या सरन्यायाधीशांपुढेच?
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होण्याची शक्यता कमीच. कोर्टाच्या कामकाजात समावेशासाठी विनंती करण्याचा पर्याय शिल्लक.
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्ष प्रकरणी (Maharashtra Political Crisis) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. तसेच, हे प्रकरण नव्या सरन्यायाधीशांसमोर जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नव्हता. तातडीनं सुनावणीसाठी लिस्ट करण्यात आलेल्या प्रकरणांमध्येही राज्यातील सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Politics) प्रकरणाचा समावेश नव्हता. त्यामुळे या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता मावळली आहे. अशातच, न्यायालयाच्या कामकाजात समावेशासाठी विनंती करण्याचा पर्याय अद्याप शिवसेनेकडे (Shiv Sena) शिल्लक आहे. दुपारी शिवसेनेचे नेते न्यायालयात तशी विनंती करु शकतात.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. आजच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित असलेले शिवसेनेचे सगळे नेते न्यायालयातून बाहेर आले. न्यायालयाच्या आजच्या (गुरुवारी) कामकाजात या प्रकरणाचा समावेश करावा, अशी विनंती करण्याचा पर्याय अद्यापही शिवसेनेकडे उपलब्ध आहे. दुपारनंतर तशी विनंती उद्धव गटाचे वकील न्यायालयाकडे करु शकतात. असं असलं तरी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याबाबत अनिश्चितता कायम आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सातत्यानं पुढं ढकलली जात होती. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं काल (बुधवारी) शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण कोर्टात मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिली. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्णमुरारी यांच्याच खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं होतं. तसेच, आज (गुरुवारी) घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल, असं स्पष्ट केलं होतं. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नव्हता. त्यामुळे आजही महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरणाची सुनावणी टळण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या कामकाजात समावेशासाठी विनंती करण्याचा पर्याय अद्याप शिवसेनेकडे शिल्लक आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असलं, तरी सत्तापेच मात्र कायम आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत 'तारीख पे तारीख'चं सत्र सुरु झालं आणि जूनपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या सलग चार तारखा लांबणीवर गेल्या.
सत्तासंघर्षात आतापर्यंत काय-काय घडलं?
26 जून : अपात्रतेच्या नोटिशीला शिंदे गटाचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान
27 जून : बंडखोर आमदारांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा
29 जून : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
30 जून : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतली शपथ, शिंदे यांची निवड आणि विधानसभा अध्यक्ष निवडीला शिवसेनेचं आव्हान
11 जुलै : सुनावणी टळली, प्रकरण 'जैसे थेच'
20 जुलै : प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचे संकेत देत सुनावणी पार पडली
31 जुलै : सुनावणी पुन्हा लांबणीवर
3 ऑगस्ट : न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद
23 ऑगस्ट : प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं