Sharad Pawar : शिंदेंच्या मागे भाजपच, अजित पवारांना त्याची माहिती नाही, बंडखोरांना इकडे यावंच लागेल; शरद पवार
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्यामागे भाजप असून त्याची माहिती अजित पवारांच्या पेक्षा आपल्याला जास्त असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या मागे असणारा राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजपच आहे, अजित पवारांना त्याची जास्त माहिती नसेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. सरकार टिकणार की नाही हे विधानसभेतील बहुमत ठरवेल आणि महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंडखोर आमदारांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी इकडे यावेच लागेल असही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी हे वक्तव्य केलं.
शरद पवार म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवारांना इथली स्थानिक माहिती आहे, पण गुजरात आणि आसाममधील परिस्थिती आम्हाला जास्त माहित आहे. एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्यानुसार देशात सहा राष्ट्रीय पक्ष असून भाजप सोडून इतरांचा त्यांच्यामागे हात आहे का याचा विचार करावा. गुजरात आणि आसामला ज्या लोकांनी शिंदेची व्यवस्था केली ते अजित पवारांच्या परिचयाचे नाही, ते माझ्या परिचयाचे आहेत. त्यामुळे मला त्याची माहिती आहे."
बाहेर गेलेल्या आमदारांना परत यावंच लागेल
शरद पवार म्हणाले की, "बाहेर गेलेले आमदार राज्यात परतल्यानंतर शिवसेनेसोबत असतील असा विश्वास वाटतोय. विधानसभेत ज्या वेळी बहुमत चाचणी होईल त्यावेळी समजेल हे सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती मी महाराष्ट्रात याआधी अनेकदा पाहिली आहे. आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल असा विश्वास आहे. जे लोक बाहेर गेले, त्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्याने ते नाराज आहेत. मग ही नाराजी या आधी का काढली नाही? हिंदुत्वाचा मुद्दा या आधी का काढला नाही? संजय राऊत यांनी त्यांना इकडे येऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. त्यामुळे त्यांना इकडे यावंच लागेल."
राज्यातील महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, "या अडीच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये महाविकास आघाडीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोना काळात उत्तम काम केलं. हे असं असताना राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग फसला हे म्हणणं राजकीय अज्ञान आहे."