Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे यांच्या सारखाच; सुप्रिया सुळेंकडून उद्धव ठाकरेंचे कौतुक
Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बंडखोर आमदारांनी परत यावे, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व चुका पोटात घ्यायला तयार आहेत तर आमदारांनी परत यावे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis : "मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे यांच्या सारखा असावा, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांचे कौतुक केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यातील खरेपणा मनाला भावतो. राजकारणात चढ-उतार येत असतात. पण शेवटी माणसं आणि नाती महत्वाची असतात. या नात्यांचा ओलावाच आयुष्यात टिकतो, असे देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले."उद्धव ठाकरे यांनी आज ज्या भावना दाखवल्या आहेत त्या खूप मोठ्या मनाच्या माणसाच्या आहेत. आज मला माँ आणि बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत आहे. त्या दोघांमधील संवेदनशीलता उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दिसत आहे. बाळासाहेबांनी सर्वांनाच प्रेम दिलं. त्यात माझा देखील समावेश आहे. मला सुद्धा अगदी लहान पणापासून त्यांनी प्रेम दिलं, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
बंडखोर आमदारांनी परत यावे
यावेळी सुप्रिया सुळे यांनी बंडखोर आमदारांनी परत यावे असे आवाहन देखील केले. "उद्धव ठाकरे मोठ्या भावाप्रमाणे सर्व चुका पोटात घेतात. जेथे नाती असतात तेथे जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे बंडखोरी केलेल्या आमदारांच्या सर्व चुका विसरून पुन्हा त्यांना पक्षासोबत घेण्यास उद्धव ठाकरे तयार आहेत. एवढेच नाही तर सर्वांना माफ करायला देखील उद्धव ठाकरे तयार आहेत. कुटल्याही कुटंबात भांड्याला भांड लागतचं. परंतु, त्यानंतर आपापसातील सर्व मतभेद विसरून कुटुंब एकत्र येते. उद्धव ठाकरे यांनी आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे तर बंडखोर आमदारांनी परत यावे, असे आवाहन यावेळी सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
"जे आज राष्ट्रवादीला दोष देत आहेत ते या पूर्वी राष्ट्रवादीत होते. आम्ही पण पक्ष सोडले पण आजही आमच्यात प्रेम आहे. एकत्र ताटात जेवलो असेल तर त्या मिठाला जागण्याची माझी सवय आहे, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले.