Police Recruitment : पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात, उमेदवारांच्या शारीरिक क्षमतेचा कस लागणार
Police Recruitment : राज्यात आजपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. राज्यभरातून सुमारे 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत.
Police Recruitment : राज्यात आजपासून (2 जानेवारी) वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) मैदानी चाचणीला (Physical Efficiency Test) सुरुवात झाली आहे. सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे तेव्हापासून लाखो तरुण दररोज सकाळी मैदानी चाचणीसाठी सराव करत आहेत. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच शंभर टक्के तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भरती प्रक्रिया अचूक आणि पारदर्शीपणे व्हावी यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात असल्याचं पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे.
14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. त्यासाठी मागवण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. परंतु सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरातून सुमारे 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. त्यानुसार, आजपासून पोलीस भरतीच्या शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे.
कोणकोणत्या तारखेला शारीरिक चाचणी?
2 ते 4 जानेवारीपर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी तर 5 जानेवारीला महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. 6 ते 14 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. तर 15 ते 17 जानेवारीपर्यंत पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. रविवारचा दिवस वगळून ही चाचणी होणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
मैदानी चाचणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक
दरम्यान मैदानी चाचणीला येताना उमेदवारांनी कोणती कागदपत्रे सोबत आणणं आवश्यक आहे, याबाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ही कागदपत्रे सोबत आवश्यक
- उमेदवारांच्या ओळखपत्राच्या दोन प्रती
- आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती,
- सर्व मूळ कागदपत्रे
- सर्व कागदपत्रांचा छायांकित प्रतींचा संच
- अर्जावर सादर केलेला फोटो (सहा फोटो)
- आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन्स, प्रवेश पत्र
हिंगोलीत 21 जागांसाठी पोलीस भरती, सकाळी पाच वाजल्यापासून उमेदवारांच्या लांबच लांब रांगा
हिंगोली पोलीस दलामध्ये 21 जागांसाठी आज सकाळपासूनच पोलीस भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या पोलीस भरती प्रक्रियेसाठी कडाक्याच्या थंडीमध्ये उमेदवारांनी सकाळपासूनच रांगा लावल्यास पाहायला मिळत आहे. कागदपत्रांची पडताळणी यासह शारीरिक सर्व तपासण्या केल्यानंतर उमेदवाराला पुढील भरती प्रक्रियेसाठी तयार केलं जात आहे. हिंगोली जिल्हा पोलीस दलामध्ये 21 जागांसाठी 1435 उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज केले आहेत. 2 जानेवारी ते 4 जानेवारी या काळात ही पोलीस भरती प्रक्रिया होती.
भावी पोलीस होण्यासाठी हजारो उमेदवार सज्ज, परभणी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक चाचणी
अनेक वर्ष रखडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर सुरुवात झालेली आहे. आजपासून पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक क्षमता चाचणीला जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे. परभणी जिल्ह्यातील एकूण 75 पोलीस शिपाई जागांसाठी 4900 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. यासाठी आज सकाळपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक क्षमता चाचणीला सुरुवात झाली आहे. भावी पोलीस होण्यासाठी हजारो उमेदवार सज्ज झाले आहेत.
संबंधित बातमी