Maharashtra Omicron Cases: राज्यात 111 नवे ओमायक्रॉनबाधित, अहमदनगरमध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण
Maharashtra Omicron Cases : राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 4456 रुग्णांची नोंद झाली आहे तर 3304 रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत मात्र काहीशी चढ-उतार होत असल्याचं पहायला मिळतंय. राज्यात आज ओमायक्रॉनच्या 111 रुग्णांची नोंद झाली आहे. काल ओमायक्रॉनच्या 351 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 4456 रुग्णांची नोंद झाली आहे तर 3304 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 1,122 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यात आतापर्यंत 8904 लोकांची ओमायक्रॉन चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 334 अहवाल प्राप्त झाले आहेत. 913 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. राज्यात आज अहमदनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे 21 रुग्णांची नोंद झाली आहे. तर नवी मुंबईत 15, जालना आणि यवतमाळमध्ये 15, औरंगाबादेत 10, नागपूर आणि मुंबईत 9. ठाणे महानगरपालिकेत 6, साताऱ्यात 3 आणि लातूरमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे.
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 2 हजार 748 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या किंचीत वाढली असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 5 हजार 806 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 41 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 75 हजार 578 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.77 टक्के आहे. सध्या राज्यात 2 लाख 79 हजार 743 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1169 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 67 लाख 57 हजार 238 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus : गेल्या 24 तासात देशात 30 हजार 615 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 514 जणांचा मृत्यू