(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकीकडे उन्हाचा तडाखा, दुसरीकडे अवकाळीने झोडपलं, शेतकऱ्याच्या तोंडाचा घास हिरावला
Maharashtra Unseasonal Rainfall : कडाक्याच्या उन्हामुळे राज्य होरपळून निघाले होते. काही ठिकाणी पिकेही करपली होती. या उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या शेतकऱ्याला आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागतोय.
Maharashtra Unseasonal Rainfall : महाराष्ट्रामध्ये निसर्गाच्या लहरीपणा भर उन्हाळ्यामध्येही सुरुच आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ झाली होती. अनेक जिल्ह्याचा पारा 40 च्या पार गेला होता. कडाक्याच्या उन्हामुळे राज्य होरपळून निघाले होते. काही ठिकाणी पिकेही करपली होती. या उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या शेतकऱ्याला आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागतोय. कडाक्याच्या ऊन असतानाच अचानक अवकाळी पाऊस पडला, यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि तळकोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. काही ठिकाणी तर गारपीठही झाली. यामुळे द्राक्षे आणि अंब्यासह इतर पिकांचेही नुकसान झाले आहे.
नाशिकमध्ये प्रचंड नुकसान -
बळीराजावर आलेलं अस्मानी संकट हटण्याचं नाव घेत नाहीय. मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील गिरणारेसह आजूबाजूच्या परिसराला वादळी वाऱ्यासह गारपिटीनं अक्षरशः झोडपून काढलं. जवळपास तासभर झालेल्या पावसाने कांदा, द्राक्ष यासह भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. शेतकरी सुभाष कसबे यांच्या एक एकरातील ढोबळी मिरचीसाठी लावलेले शेडनेट पूर्णपणे तुटलंय. तर कांदा ओला झाल्यानं तो सडून जाण्याची भिती आहे. जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याचं ते सांगतात. चिंतेची बाब म्हणजे या पावसामुळे उन्हाळी कांद्याला मोठा फटका बसला असून कांद्याची उभी पिकं आडवी झाली आहेत. एकीकडे आधीच कांद्याला भाव मिळत नाहीय, माल सडून जातोय तर दुसरीकडे या पावसामुळे बळीराजा हतबल झालाय.
अवकाळीमुळे आंबा महागण्याची शक्यता -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी हजेरी लावली. अवकाळी पावसाने आंबा, काजू पिकाला मोठा फटका बसला आहे. आंबा, काजूला बुरशी, कीड रोगांचा पादुर्भाव तर आंबा डागाळण्याची दाट शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात पावसाचा हलकासा शिडकाव. लांजा, राजापूरमध्ये विजांचा देखील कडकडाट
सांगली-सातारा-कोल्हापूरमध्येही अवकाळीचा फटका -
सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. तीन दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कडक उन्हामध्ये अचानकच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोल्हापूरच्या ग्रामीण भागातही गारांचा पावसाने चांगलेच झोडपले. बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय.
महाराष्ट्र केसरीलाही फटका -
सातारा येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरीलाही वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे सामन्याचे मॅट उखडले. त्यामुळे आयोजकांची चांगलीच धावपळ उडाली.
सांगली जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा -
सांगली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडासह दमदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर मिरज शहरात जोरदार गारपीट झाली. वादळी वारे आणि गारांसह आज मिरज भागात आज पुन्हा एकदा पाऊस पडला. सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने बेदाणा आणि घराचे मोठे नुकसान झाले आहे. तर जत मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी कागणेरी गावांत वाऱ्यामुळे बेदाणा शेडचे ताडपद्री उडू लागली होती.ताडपद्री धरून शेडचे बचाव करताना कर्मचारी भर वाऱ्यात आणि पावसात उभे राहिले. या पावसाने बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेदाणा पूर्ण भिजला आहे.
सोलापुरातही पावसाची हजेरी, शेतकऱ्याचे नुकसान -
सोलापुरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या भागात पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱा आणि गारपीठ झाल्याने हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. दक्षिण सोलापुरातील बंकलगी गावात द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. बंकलगी गावातील माणिकराव देशमुख यांच्या शेडनेडमध्ये ठेवलेल्या द्राक्षांचा अक्षरश: चिखल झालाय. बेदाणा करण्यासाठी शेडनेडमध्ये हे द्राक्ष वाळवण्यासाठी ठेवण्यात आले होते. मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने जवळपास अडीच हजार किलो द्राक्षांचा चिखल झालाय. साधारण 4 ते 5 लाख रुपयांचा माल पूर्णपणे पाण्यात भिजून खराब झालाय. वारा इतका वेगात होता की केवळ द्राक्षांचे नाही तर शेडनेटचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हाताशी आलेल्या पिकासोबत भांडवली गुंतवणुकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान राज्यशासनाने याकडे गांभीर्यपुर्वक लक्ष देऊन मदत द्यावी अशी प्रतिक्रिया शेतकरी प्रवीण देशमुख यांनी दिली.