नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेंना वादग्रस्त पत्राप्रकरणी गृह विभागाची कारणे दाखवा नोटीस
महसूल संदर्भातील वादग्रस्त पत्राप्रकरणी मंत्रीमंडळाची नाराजी दूर करण्यासाठी संजय राऊत यांना भेटण्यासाठी दीपक पांडे पोहचल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नाशिक : नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना महसूल संदर्भातील वादग्रस्त पत्राप्रकरणी गृह विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आयुक्त दीपक पांडे यांच्या वादग्रस्त पत्राचे पडसाद मंत्रीमंडळ बैठकीत उमटले आहेत. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत देखील या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
तत्पूर्वी नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे संजय राऊत यांच्या भेटीला गेले आहेत. आज मंत्रीमंडळ बैठकीत दीपक पांडे यांच्या वादग्रस्त पत्राचे पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रीमंडळ बैठकीत पोलीस अधिकारी यांना असं पत्र लिहिण्याचा अधिकार कोणी दिला असं म्हणत दीपक पांडेवर नाराजी व्यक्त केली होती. दीपक पांडे हे संजय राऊत यांच्या निकटवर्तीय पोलीस अधिकारी मानले जातात. मंत्रीमंडळाची नाराजी दूर करण्यासाठी संजय राऊत यांना भेटण्यासाठी दीपक पांडे पोहचल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डिटोनेटरसारखे आहेत. यातून एक जिवंत बॉम्ब तयार होत असून तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो. हे भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचा छळ करून वित्तीय आणि जिवितास धोका निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केला होता. तसेच महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घ्यावेत, अशी मागणी दीपक पांडे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली होती.
हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही, असा आदेश दिल्यामुळे चर्चेत आलेले दिपक पांडे पुन्हा एकदा चर्चेत आले होते. ते म्हणजे, त्यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्राला. या पत्रातून त्यांनी महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घेण्याची मागणी केली होती. आता या प्रकरणी गृह विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
संबंधित बातम्या :
नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या वादग्रस्त पत्राचे पडसाद मंत्रीमंडळ बैठकीत, अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी
Nashik : महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार RDX सारखे का? नाशिक पोलीस आयुक्तांनी स्पष्ट सांगितले..
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
