राज्यातील काँग्रेस नेते गायब, राष्ट्रवादीत काही शिल्लक राहिलं नाही; विखे पाटील यांचे विरोधकावर टीकास्त्र
विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात. मात्र इतर नेते पूर्णतः गायब झालेत. देश पातळीसह राज्यात काँग्रेसची वाताहत झाली आहे, अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
अहमदनगर : राज्यातील काँग्रेस (Congress) नेते गायब झाले आहेत, त्यामुळेच काँग्रेसची सर्वत्र वाताहात होत आहे, अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (RadhaKrishna Vikhe Patil) यांनी केलीय. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही शिल्लक राहिलं नसल्याचं वक्तव्य विखे-पाटील यांनी केले आहे. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मतदारसंघातील निळवंडे गावात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इंदुरीकर महाराजांच्या सासुबाई सरपंच असलेल्या गावात विखे यांनी रविवारी दौरा केला
माजी महसूलमंत्री थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे पालकमंत्री विखे पाटील यांनी दौरा केला आहे. यावेळी विखे पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला पवार या गावच्या सरपंच असून यावेळी विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम तसेच निळवंडे धरण कालव्याच्या जलपूजन विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. "योजना पंतप्रधान मोदींच्या आणि फोटो भलत्यांचेच असे चित्र या संगमनेर तालुक्यात दिसून येत आहे. मोफत रेशन आम्ही वाटलं, मोफत लस आम्ही दिली आणि फोटो मात्र भलतेच लावत आहे", अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री थोरात यांच्यावर केली आहे.
काँग्रेस आमदार फुटणार?
भविष्यात काँग्रस आमदार फुटणार या वक्तव्यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मी भविष्यवाणी करणारा माणूस नाही. मात्र विरोधी पक्षांना भविष्य राहिले नाही हे तितकेच खरे आहे. परंतु माझ्या संपर्कात कोणी नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
विखे पाटलांची बाळासाहेब थोरातांवर टीका
दुसर्याच्या नावाने शिमगा करण्यापेक्षा मोदी सरकारने जनतेसाठी काय केलं हे जनतेला सांगितले गेले पाहिजे. जे करायला आम्ही कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे पण दुर्दैवाने या तालुक्याचा ताबा ठेकेदारांनी घेतला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, शौचालय, कारखाना संचालक, पुढारी सर्व तेच असल्याचे सांगत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व त्यांच्या समर्थकांवर भाषणातून जोरदार निशाणा साधला. गोरगरीब जनतेचा स्वाभिमान जागृत करणे आणि त्याचा आवाज आला पाहिजे यासाठी ही संकल्प यात्रा असून त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. कोणाला जलनायक व्हायचं किंवा खलनायक व्हायचं ते होऊ द्या आपण जनतेसाठी काम करायचं असा टोला सुद्धा थोरात यांच्या जलनायक म्हणून लागलेल्या फ्लेक्सवरून केली आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटतं नाही. मी विरोधी पक्षनेता असताना काँग्रेसमधील नेते माझ्यावर टीका करायचे. आता विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात. मात्र इतर नेते पूर्णतः गायब झालेत. देश पातळीसह राज्यात काँग्रेसची वाताहत झाली आहे. राष्ट्रवादीत काही शिल्लक राहिलं नाही. शिवसेना नेत्यांना कधीतरी सभगृहात जाण्याचे आठवते. तीन राज्यातील निकालानंतर विरोधी पक्ष नामशेष झाला आहे. जनतेचा मोदींवर विश्वास, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.