Sanjay Rathod | संजय राठोड पोहरागडला जाणार, शासकीय दौरा जाहीर
अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड उद्या पोहरागडला जाणार आहेत. त्यांचा शासकीय दौरा जाहीर झाला आहे.
यवतमाळ/वाशिम : गेले अनेक दिवस नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा शासकीय दौरा जाहीर झाला आहे. टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर संजय राठोड अनअव्हेलेबल होते. परंतु उद्याचा त्यांचा शासकीय दौरा जाहीर झाला असून अनेक दिवसांनी ते कॅमेऱ्यासमोर दिसतील. संजय राठोड वाशिममधल्या पोहरादेवीचं दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे. यावेळीच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आपली बाजू स्पष्ट करतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे राठोड काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
दरम्यान संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवी येथील बंजारा धर्मपीठावर नतमस्तक होणार आहेत. संजय राठोड यांच्या स्वागतासाठी दिग्रसमध्ये समर्थकांकडून जय्यत तयारी सुरु आहे. शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी, होर्डिंग्ज उभारणं सुरु आहे. याशिवाय त्यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीतील पीठांनीही जय्यत तयारी केली आहे. त्यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीतील जगदंबा पीठावरील मंदिरांवर आज विद्युत रोषणाई करण्यात आली. सोबतच पीठावरील भक्त निवासावरही रोषणाई केली आहे.
Pooja Chavan Death Case | संजय राठोड गायब नाहीत, ते संपर्कात आहेत : अजित पवार
कसा आहे संजय राठोड यांचा दौरा
- सकाळी 9 वाजता : वाशिमच्या मानोरा तालुक्यातील श्री क्षेत्र पोहरागडकडे रवाना होणार
- सकाळी 11.30 वाजता : श्री श्रेत्र पोहरागड इथे आगमन आणि दर्शन
- दुपारी 1 वाजता : दारव्हा तालुक्यातील श्री क्षेत्र मुंगसाजी महाराज संस्थान धामनगाव देवकडे रवाना होणार
- दुपारी 2.30 वाजता : श्री क्षेत्र मुंगसाजी महाराज संस्थान धामनगाव देव इथे आगमन आणि दर्शन - दुपारी 3.30 वाजता : यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार
- दुपारी 4.30 वाजता : जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन, यवतमाळ जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेबाबत आयोजित बैठकीला उपस्थित राहणार.
-सोईनुसार : यवतमाळमधील निवासस्थानाकडे रवाना होणार
काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण? मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात राहात होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.