Today's Top News : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
National News : एबीपी माझाच्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत असतो.
मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
राणा दांपत्याच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी
राणा दांम्पत्यांना जामीन मिळणार? राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राणा दांपत्याच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी. राज्य सरकार सादर करणार आपलं उत्तर, कोर्ट सुनावणीची तारीख देण्याची शक्यता. राणांनी जेलमध्ये घरच्या जेवणासाठी केलेल्या अर्जावरही आज होणार सुनावणी.
डॉ. जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी
गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यांना दिलेला अंतरिम दिलासा आज संपतोय, त्यामुळे त्यांनी आणखीन दिलासा मिळणार का? हे आज सुनावणी झाल्यानंतर समजणार आहे.
शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा होणार सुरू, उद्धव ठाकरे घेणार खासदारांची बैठक
मुंबईत शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे, त्यासाठी आज रात्री 8 वाजता वर्षावर स्नेहभोजन आणि आढावा बैठक. शिवसंपर्क अभियानाला 15 मे दरम्यान सुरूवात होणार. तसेच बीकेसीमध्ये शिवसेनेचा मोठा मेळावाही होणार आहे. मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या दोन विषयांवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. असं असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे.
लाऊडस्पीकरच्या वादात दादरच्या शिवाजी पार्कमध्ये 3 मे रोजी नमाज अदा करण्याची मागणी
औरंगाबादचे वकील नईम शेख यांनी मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून रमजान ईदनिमित्त 3 मे रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर नमाज अदा करण्यास परवानगी मागितली आहे. नईम यांनी अर्जात रमजान ईदनिमित्त शिवाजी पार्कचे मैदान नमाज अदा करण्यासाठी आरक्षित करावे, असे लिहिले आहे. तसेच नईमने हे पत्रही बीएमसीला पाठवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन दिवसीय सेमीकॉन इंडिया 2022 परिषदेचे करणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता बेंगळुरू येथे पहिल्या सेमीकॉन इंडिया 2022 परिषदेचे उद्घाटन करतील. भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, सेमीकंडक्टर डिझाइन आणि नवीन उत्पादन बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी सेमिकॉन इंडिया-2022 या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आज ते 1 मे या कालावधीत आयटीसी गार्डनिया, बंगळुरू येथे सेमिकॉन इंडिया 2022 परिषदेचे आयोजन करत आहे.
PBKS vs LSG : पंजाबचे 'किंग्स' लखनौच्या नवाबांना रोखणार का?
PBKS vs LSG, 2022 : आयपीएल 2022 मध्ये शुक्रवारी 42 वा सामना खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये पुण्याच्या एमसीए मैदानावर सामना रंगणार आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालाली लखनौ टीम लयीत दिसत आहे. दुसरीकडे पंजाबने कसबसं स्वत:चं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. केएल राहुल आणि मयांक अग्रवाल...हे दोन मित्र शुक्रवारी आयपीएलच्या मैदानात एक दुसऱ्याविरोधात उभे राहणार आहेत.
आज रिलीज होणारे चित्रपट
अजय देवगण निर्मित आणि दिग्दर्शित 'रनवे 34' हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. सत्य घटनांनी प्रेरित, रनवे 34 मध्ये अमिताभ बच्चन, अजय देवगण, रकुल प्रीत सिंग, बोमन इराणी, आकांक्षा सिंग आणि अंगिरा धर यांच्या भूमिका आहेत.
'हिरोपंती-2' आज रिलीज होणार
बॉलिवूड अॅक्शन हिरो टायगर श्रॉफचा 'हिरोपंती-2' आज रिलीज होत आहे. या चित्रपटात तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अहमद खान दिग्दर्शित 'हीरोपंती 2' रजत अरोरा यांनी लिहिला असून संगीत एआर रहमान यांनी दिले आहे.
चिरंजीवीचा 'आचार्य' चित्रपट आज प्रदर्शित होणार
मेगास्टार चिरंजीवीचा 'आचार्य' चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चिरंजीवी, राम चरण, काजल अग्रवाल आणि पूजा हेंगडे या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव कोरटाला यांनी केले आहे.
मराठी चित्रपट 'चंद्रमुखी' आज प्रदर्शित होणार
मराठी संगीत नाटक 'चंद्रमुखी' आज प्रदर्शित होणार आहे. 'चंद्रमुखी' ही 80 च्या दशकातील कथा आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात अजय-अतुल या संगीतकार जोडीने संगीत दिले आहे.