Nashik Tomato Market : नाशिकच्या गिरणारे बाजारपेठेत दिवाळीनंतर टोमॅटोचे दर का घसरलेत? नेमके कारण काय?
Nashik Tomato Market : नाशिकच्या गिरणारे (Girnare) बाजारपेठेत (Tomato) दिवाळीनंतर टोमॅटोचे मार्केट डाऊन झाले आहे.
Nashik Tomato Market : काही दिवसांपासून गिरणारेच्या (Girnare) बाजारपेठेत सुरु असलेल्या टोमॅटोच्या (Tomato) आवकेत वाढ झाली असली तरी मात्र दिवाळीनंतर (Diwali) टोमॅटोच्या बाजारभावात घसरण पाहायला मिळते आहे. जवळपास आठ दिवसांपूर्वी आठशे रुपयांना जाणारी टोमॅटो कॅरेट तीनशे ते चारशे रुपयांवर येऊन पोहचले आहे. त्यामुळे खर्च निघून येईल अशी आशा मनात असतांनाच दिवाळीनंतर मार्केट डाऊन झाले आहे. विशेष म्हणजे बंगलोरचा टोमॅटो हंगाम यावर्षी नेमका आताच सुरु झाला असल्याने व्यापारी वर्ग तिकडे वळल्याने टोमॅटो दारात घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांद्यासाठी लासलगाव बाजारपेठ (Lasalgoan) सर्वात महत्वाची समजली जाते. त्याचप्रमाणे अलीकडच्या वर्षात गिरणारे बाजारपेठ भाजीपाला त्यातही टोमॅटो पिकासाठी महत्वाची मानली जाते. गिरणारे परिसरातील हजारो शेतकरी टोमॅटो पिकाचे उत्पादन घेत असून या बाजारपेठेत कोटींची उलाढाल होते. यंदा नाशिक भागातील टोमॅटो उत्पादकांत दांडगा उत्साह होता. वातावरणातील बदलाने सतत फटका दिल्यामुळे पारंपारिक द्राक्ष उत्पादकही बागा तोडून टोमॅटोकडे वळले आहेत. त्यामुळे गिरणारे परिसरात टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. लहानात लहान शेतकरी देखील भाताचे एक वावर कमी करून टोमॅटो लागवड करण्यावर भर देत आहेत. अशातच यंदा झालेल्या जोरदार पावसाने त्यातही परतीच्या पावसाने टोमॅटो पिकाला मोठा तडाखा बसला.
दरम्यान पावसाने धूळधाण उडवून दिल्यानंतर शेतकऱ्यांनी जीवाचे रान करत टोमॅटो पिकाला जगविले. अशातच दिवाळीच्या काही दिवस याआधी गिरणारे बाजारात टोमॅटो येण्यास सुरवात झाली. यावेळी टोमॅटो उत्पादकांना प्रति क्रेटला 600 ते 800 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी दिवाळी जोरात होणार असा कयास बांधला होता. मात्र मागील 5 दिवसांपासून टोमॅटो बाजारभावात कमालीची घसरण झाली असून प्रति क्रेटचे दर कमाल 800 वरुन हे दर कमाल 400 पर्यंत म्हणजे निम्म्याने खाली आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून एवढ्या कमी दिवसात दर इतके खाली कसे आले? असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करत आहेत. हे दर तरी टिकून रहावेत अशी टोमॅटो उत्पादकांची अपेक्षा आहे. तसे झाले तरच यंदाचा झालेला भरमसाठ खर्च निघून येईल. यामागे विशेष कारण म्हणजे बंगलोरचा टोमॅटो हंगाम यावर्षी नेमका आताच सुरु झाला असल्याने देशातील टोमॅटो व्यापारी खरेदीदार निर्यातदार हे कर्नाटककडे वळले असल्याने ही उतरण झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. तरी सध्याचे दर स्थिर राहतील अशी स्थिती असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दर का घसरलेत?
दरम्यान दिवाळीच्या सुमारास गिरणारे परिसरात टोमॅटोची आवक सुरु होते. मात्र यंदा गिरणारे मार्केट सुरु झाले, त्याचबरोबर बंगलोरमध्ये देखील टोमॅटो हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील स्थानिक टोमॅटोची आवक ही दर उतरण्यामागील मुख्य कारणे व्यापाऱ्यांकडून सांगितली जात आहेत. मागील वर्षी महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील टोमॅटो उत्पादक पट्टयाचे जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले होते. यामुळे बेंगलोर हंगाम अगोदरच आटोपला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक भागातील टोमॅटोला देशभरातून मागणी होती. परिणामी टोमॅटोला शेवटपर्यंत चांगले दर मिळाले. दरम्यान मागील वर्षीचा धडा घेऊन बेंगलोर भागातील उत्पादकांनी लागवड उशिराने केल्या. तो माल मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दीड ते 2 महिन्यांनी म्हणजे ऐन दिवाळीत बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. नाशिकच्या तुलनेत काहीशा कमी दरात मिळत असल्याने नाशिक भागातील टोमॅटोच्या व्यापारी खरेदीदारांनी बेंगलोरकडे मोर्चा वळवला आहे.
निर्यातीत घट
टोमॅटो पिकाचा विचार केला तर बांग्लादेश हा सर्वाधिक आयात करणारा देश राहिला आहे. मात्र बांग्लादेशने आयातकर वाढविल्याने दोन्ही देशातील व्यापार अडचणीत आला आहे. त्यामुळेच टोमॅटोची निर्यात मंदावलेली असून गिरणारे, पिंपळगाव बसवंतच्या बाजारातून बांग्लादेशाकडे होणाऱ्या निर्यातीत 70 टक्क्यांनी घट झाली आहे. हा माल गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांत देशांतर्गत बाजारात विकण्याचा पर्याय स्विकारला जात आहे. मात्र या बाजारातून अपेक्षित उठाव होत नसल्याचे व्यापारी सांगतात. गिरणारे भागात मागील 10 वर्षांहून अधिक काळापासून व्यापार करणारे नसीम यांच्या म्हणण्यानुसार या भागातील 80 टक्के व्यापाऱ्यांनी बेंगलोरकडे मार्गक्रमण केले आहे. बेंगलोर येथील टोमॅटो हा नाशिकच्या तुलनेत 100 ते दीडशे रुपये कमी दराने मिळत असल्याने त्या टोमॅटोलाच प्राधान्य दिले आहे.