Nashik : नाशिक जिल्ह्यातही पन्नासहून अधिक गावपाड्यांना लँडस्लाईडचा धोका, प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय
Nashik : इर्शाळवाडीतील (Irshalwadi Landslide) घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाने (Nashik) देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Nashik News : रायगड (Raigad) जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील (Irshalwadi Landslide) भूस्खलनाच्या घटनेनंतर सतर्क झालेल्या नाशिक (Nashik) जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणी निश्चित करुन आवश्यकतेनुसार तेथील कुटुंब स्थलांतरित करावे, असे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा (Surgana) या चार तालुक्यांना भूस्खलनाचा सर्वाधिक धोका असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे.
इर्शाळवाडी (Irshalvadi) येथे काल रात्रीच्या सुमारास दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. जवळपास सोळा लोकांचा मृत्यू या दुर्घटनेत झाला आहे. या घटनेचे गांभीर्य विचारात घेता नाशिक जिल्हा प्रशासनाने (Nashik District) देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालानुसार नाशिक, पेठ, दिंडोरी व कळवण या चार तालुक्यांमधील 43 गावे आणि पाड्यांना भूस्खलनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यात एकट्या कळवण तालुक्यातील 30 ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा या तालुक्यांनाही लँडस्लाईडचा धोका संभवतो. भूस्खलनाचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांना भूस्खलनाची ठिकाणे निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पावसाचा जोर वाढल्यास संबंधित ठिकाणच्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशा नागरिकांसाठी तात्पुरत्या निवारागृहासाठी सामाजिक सभागृहे, मंदिर, शाळा आदी ठिकाणे राखीव ठेवावी, अशा सूचना प्रशासनाने तहसीलदारांना दिले आहेत.
राज्यातील नाशिकसह ठाणे, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, सातारा, मुंबई (Mumbai) व मुंबई उपनगर हे जिल्हे भूस्खलन प्रवण क्षेत्रात येतात. अतिपाऊस, पूर परिस्थिती, उत्खनन, डोंगर उतार कापणे, भूकंप, खोदकाम मोठ्या प्रमाणात विकास कामे ही भूस्खलनाची प्राथमिक कारणे असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात जुलैचा तिसरा आठवडा संपुष्टात आला असताना अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे तूर्तास भूस्खलनाचा धोका असलेल्या भागातील नागरिकांची स्थलांतर करण्यात आले नाही, मात्र पावसाचा जोर वाढल्यास तातडीने पाऊले उचलली जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील या गावांना धोका
दरम्यान पेठ (Peth) तालुक्यातील सदरपाडा, बिलकस, बेहडपाडा, गोडसपाडा, देवरपाडा, कासारविहीर, जांबळे तर दिंडोरी तालुक्यातील रडतोंडी, अवंतवाडी, चंडिकापूर, सूर्यगड, पिंप्राज. तसेच कळवण तालुक्यातील तातीनपाडा, जमाळे, कोसुरडे, भावकुर्डे, देसगाव, खर्डे दिगर, उंबरगव्हान, वणी, नांदूर, सप्तशृंगगड, धोडप माची, पायरपाडा आदि गावांना धोका असल्याचे सांगितले जात आहे.
ब्रह्मगिरी येथील सुपलीची मेट
दरम्यान इर्शाळवाडी येथील घटनेमुळे त्र्यंबकेश्वर शहराला भारदस्त असा लाभलेला ब्रह्मगिरी पर्वत देखील चर्चेत आला आहे. ब्रह्मगिरी पर्वताचे दगड सुटून दरड कोसळण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. ब्रह्मगिरीच्या पोटाला लागूनच अनेक वाड्यावर त्या वसलेले आहेत. यापैकीच एक असलेली सुपलीची मेट ही चर्चेत आलेली आहे. दरड कोसळण्याचा सर्वाधिक धोका ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या या सुपलीच्या मेट-वाडीला आहे. ब्रह्मगिरीच्या पोटाला सुपलीची मेट गंगाधर मेट, जांबाची मेट, पठाराची वाडी, विनायक खिंड, महादरवाजा मेट या वस्ती आहेत. येथील लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास आहे. ब्रह्मगिरीच्या आजूबाजूला अनेकदा तुरुंग लावून उत्खनन केल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी या वाड्यावर त्यांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे वेळीच प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या लोकांना स्थलांतरित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :