Nashik News : टोकाचं पाऊल का उचललं जातंय? नाशिकमध्ये 17 वर्षीय मुलीसह चौघांनी जीवन संपवलं!
Nashik News : नाशिक शहरात मागील 24 तासात चौघांनी स्वतःला संपवल्याची घटना घडली आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून अनेकदा प्रेम, व्यसनांच्या आहारी जाणं, आजाराला कंटाळून, कौटुंबिक वादातून सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. अशातूनच आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. नाशिक शहरात (Nashik City) मागील 24 तासात चौघांनी स्वतःला संपवल्याची घटना घडली आहे.
गेल्या काही वर्षात मानसिक ताणतणाव अधिकच वाढला आहे. घर, कुटुंब, संसार, नोकरी, शिक्षण आदी घटकांमुळे धावपळीचे जगणं झालं आहे. दरम्यान अशा घटकांतून मानसिक ताणतणावात अधिकच भर पडल्याचे जाणवते. यामध्ये अधिकाधिक तरुण मुलामुलींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. कारण नाशिक शहरात मागील 24 तासांत चार आत्महत्यांच्या (Suicide) घटना उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत अल्फीया इब्राहिम पिंजारी या अल्पवयीन मुलीने काल सकाळी 11 च्या सुमारास राहत्या घरातील माळ्यावर लोखंडी अँगलला सुती ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मंजू रसूल मंजूर मन्सुरी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यास ही माहिती कळवली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना म्हाडा कॉलनीत घडली. कविता शरद धंदर या महिलेने काल सकाळी 11 च्या सुमारास राहत्या घरातील बेडरूममधील छताच्या पंख्याला नायलॉनच्या पिवळ्या पट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी विजय चंद्रभान शिरसाठ यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यास ही माहिती कळविली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचा तिसरा प्रकार उपनगर येथे घडला. स्वप्नील सीताराम मोरे यांनी राहत्या घरातील इलेक्ट्रिक वायर पंख्याला बांधून गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यावर त्याचा भाऊ प्रदीप मोरे याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बंदकीने गोळी झाडून घेत आत्महत्या
स्वतःच्या बंदुकीने हनुवटीवर गोळी झाडून घेत इसमाने आत्महत्या केल्याची घटना शिंगवे बहुला येथे घडली. बाबू मुन्ना कनोजिया असे स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. कनोजिया यांनी काल रात्रीच्या सुमारास स्वतः च्या लायसनधारी सिंगल बोरच्या बंदुकीने हनुवटीवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांचे भाऊ श्याम कनोजिया यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यास ही माहिती कळविली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.