Nashik News : मोलमजुरी करून घर उभारलं, पण त्याच घरात नवरा-बायकोनं उचललं टोकाचं पाऊल; सिन्नरमधील घटनेने खळबळ
Nashik News : जळगाव जिल्ह्यातील शिंपी दाम्पत्य सिन्नर शहरात मोलमजुरी करून राहत होते. त्यांनी स्वत: चे घरदेखील उभारले. मात्र, त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर शहरातून धक्कादायक घटना समोर आली असून आर्थिक विवंचनेतून नवरा बायकोने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. घर घेण्यासाठी हातउसने घेतलेले पैसे परत देता येत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सिन्नर शहरात (Sinnar) एस. टी. कॉलनीच्या पाठीमागे राहणाऱ्या व मोलमजुरी करणाऱ्या दाम्पत्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. सिन्नर येथे घर घेण्यासाठी घेतलेले हातउसने पैसे परत देता येत नसल्याने एकाच दोरीला उभयतांनी गळफास घेत आयुष्य संपवले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सुमारे 30 वर्षांपासून मूळ जळगाव जिल्ह्यातील रोहिदास रामा शिंपी हे कुटुंबीयांसह सिन्नर शहरात वास्तव्यास होते. रोजंदारीवर काम करून आणि नंतर मोलमजुरी करून शिंपी कुटुंबीय उपजीविका करीत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हातउसने पैसे घेऊन घर घेतले होते. हे पैसे परत देऊ शकत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून ते विवंचनेत होते. अशी माहिती पोलिसांना दिली आहे.
या आर्थिक विवंचनेतूनच रोहिदास रामा शिंपी व त्यांच्या पत्नी शोभा यांनी राहत्या घरी भिंतीच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. रात्री अंधार पडूनही घरातील दिवे न लागल्याने परिसरातील नागरिकांनी आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी चौकशी करत घरात डोकावून पहिले असता एकाच हुकला दोघांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तातडीने त्यांच्या मुलास याबाबत कळविण्यात आले. त्याचबरोबर सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर घडलेला प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आला. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पवार, सुशील साळवे यांनी पंचनामा केला.
दरम्यान मयत रोहिदास व शोभा यांनी यांनी राहत्या घरी भिंतीच्या हुकाला दोन मुलगे असून, त्यापैकी एक औद्योगिक वसाहतीत रोजंदारीवर काम करतो तर दुसरा प्लंबिंग काम करतो. सिन्नर नगर परिषद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पवार अधिक तपास करीत आहेत.
आत्महत्यांचं प्रमाण वाढलं...
एकीकडे महागाई एवढी वाढली आहे कि, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडते आहे. दुसरीकडे रोजगाराचे काहीस साधन नसल्याने अनेकदा उपासमार आणि कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातूनच आत्महत्या सारखे प्रकार बळावले आहे. नाशिकसह जिल्ह्यात दररोज एक ना दोन आत्महत्यांच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात जेष्ठांसह तरुणांमध्ये देखील मानसिक ताण तणाव, नोकरी नसणं इतर काही कारणांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.