(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : केकचे पैसे मागितल्याचा राग, नाशिकमध्ये बेकरी चालकावर कोयत्याने हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
Nashik Crime : नाशिकमध्ये बेकरी चालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Nashik Crime : नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे. फुकट केक घेऊन जाणाऱ्या टोळक्याकडे बेकरी मालकाने केकचे पैसे मागितल्याचा राग आल्याने टोळक्याने दुकानाच्या मालकावर कोयता उगारत मारहाण केली आहे, सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये ही घटना कैद झाली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
नाशिक (Nashik) शहरात गुन्हेगारी वाढत असून दोनच दिवसांपूर्वी दहावीचा पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला (Koyata Gang) केल्याची घटना ताजी असतानाच सातपूर (Satpur) परिसरातील अभिषेक बेकरीमध्ये शनिवारी सायंकाळी बेकरी चालकावर कोयत्याने हल्ला चढविल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी हा परिसर गोळीबाराच्या घटनेने हादरला होता. यातील संशयित अद्यापही मोकाट असताना दुसरा प्रकार घडल्याने नाशिकच्या गुन्हेगारीवर अंकुश लावणारे कोणी आहे का नाही असा सवाल उपस्थित केला आहे. या हल्ल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी (Satpur Police) पाच जणांना अटक केली आहे.
सातपूर कार्बननाका परिसरातील अभिषेक बेकरीमध्ये केक देण्याचा बिलावरून वाद झाल्याने टोळक्याने शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास बेकरीचालकावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी संशयिताना ताब्यात घेत त्यांची धिंड काढली. शुभम अरुण पवार, हेमंत अरुण गाडेकर, मुकेश दिलीप कुंभार, सागर सुरेश गायकवाड, नयन विठ्ठल गावडे, पंकज ऊर्फ विकी कैलास अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूरमधील शिवाजी नगर भागात शनिवार रात्री 9 वाजेच्या सुमारास अभिषेक बेकरीमध्ये सात ते आठ युवकांनी बेकरीचालकांशी वाद घातला. त्यानंतर टोळक्यांना युवकांना बोलावून बेकरीचालक व कामगारांना धमकावून कोयत्याचा वार करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी बेकरीमालक अनिकेत सुरेश जाधव यांनी सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आहेर करीत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नाशिकच्या गुन्हेगारी अंकुश लावणार कोण?
नाशिक शहरात गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारी बोकाळली आहे. सातत्याने खून, लूटमार, प्राणघातक हल्ले होत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक वेठीस धरले जात आहेत. त्यामुळे शहरात होणाऱ्या घटनांना यावर घालणे गरजेचे झाले आहे. शहरातील विविध भागात रात्रीच्या वेळी खुलेआम मोकळ्या मैदानात दारू पार्टी, यातून होणारे वाद नित्याचे झाले आहेत. यावर पोलीस प्रशासन अंकुश लावणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.