Nashik Crime : शेजारच्याला सांगून घराबाहेर पडा! नाशिकमध्ये 34 लाखांवर डल्ला, सोन्याचे दागिनेही पळवले!
Nashik Crime : नाशिक शहरात डोळ्यांची पापणी लवता न लवता तोच चोरी, लूटमार होत आहे.
Nashik Crime : नाशिकमध्ये एकीकडे शिवजंयतीची मिरवणूक सुरु असताना पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला. शिवाय नुकतेच नाशिक पोलिसांनी गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी चार पथकांची नियुक्ती केली. अशातच नाशिक शहरात 34 लाखांची घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक (Nashik) शहरात चोरी, हाणामारी किरकोळ गुन्ह्यात वाढ झाली आहे. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच चोरी, लूटमार होत आहे. त्यातच नाशिकमधून एका जबरी चोरीची घटना समोर आली आहे. तब्बल 34 लाखांच्या रोकडसह 70 हजारांचे दागिने घेऊन चोरट्याने पळ काढला आहे. त्यामुळे परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे.
सद्यस्थितीत नाशिक शहरासह जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे (Crime) नाशिककर भयभीत आहेत. प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून टोळकेच्या टोळके सर्रासपणे हातात चॉपर, कोयते घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. अशातच दिवसाढवळ्या घरात घुसून घरफोडीच्या घटना सर्रासपणे घडत आहेत. जर कुटुंब विरोध करत असेल तर मारहाण किंवा धारदार शस्त्राने जखमी करून लूटमार केली जात आहे. नाशिक शहरातील नाशिकरोड (Nashikroad) भागातील टाकळी रोड परिसरात राहणारे प्रशांत खडताळे यांच्या घरात चोरी झाली आहे. या घरफोडीच्या तब्बल 34 लाख रुपयांची चोरी करण्यात आली आहे. शिवाय 70 हजारांचे सोन्याचे दागिनेसुद्धा लांबवले आहेत.
प्रशांत खडताळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साधारण 19 फेब्रवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली आहे. येथील टाकळी रोड परिसरात अनुसयानगरमध्ये खडताळे कुटुंब वास्तव्यास आहे. हे कुटूंब बाहेरगावी नातेवाईकांकडे भेटण्यासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्याने दरवाजाचे कडीकोयंडा तोडून आता प्रवेश केला. घरातील लॉकरचे कुलूप तोडून जवळपास 34 लाख रुपयांची रोख कॅश पळवली आहे. तसेच 70 हजार रुपयांच्या प्रत्येकी दहा ग्रॅम असलेल्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या आहेत. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडीच्या अनेक घटना
मागील काही दिवसात नाशिक शहरात जबरी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात सातपूर, हिरावाडी, नाशिकरोड, द्वारका परिसरात घरफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. नाशिक शहरातील बजरंगवाडी परिसरात काही दिवसांपूर्वी तीन किलो चांदीच्या गणेशमूर्तीसह सोन्याचे लॉकेट घड्याळ घरफोडी करून चोरून नेल्याची घटना घडली होती. दुसरी घटना ही नाशिकरोड परिसरातील भागात घडली होती. येथील सेवानिवृत्त भारतीय सैनिकाच्या घरात घोरपडी झाला घरफोडी करत तब्बल 25 तोळे सोने व एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. तिसरी घटनाही हिरावाडी परिसरात घडली असून या ठिकाणी पाच तोळ्याच्या दागिन्यांसह रोख रोकड असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला होता.