Maratha Kranti Morcha: पुन्हा अशी वक्तव्ये कराल तर...,मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर मराठा क्रांती मोर्चाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर (Maratha Reservation) वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मराठा क्रांती मोर्चानेदेखील नाराजी व्यक्त केली असून आपल्या वक्तव्यावर माफी मागा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) केली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. आम्ही सामान्य मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाही. तानाजी सावं सकल मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काहीतरी भान राहिले आहे का असा खडा सवाल करत तुम्हाला उघड समाजाच्या भूमिके सोबत येणे शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करू नका. तरी आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा असेही केदार यांनी म्हटले. 'मराठ्यांनी ओबीसी मधूनच आरक्षण' ही भूमिका कुणाही विरोधी पक्षाचा सांगण्यावरून घेतलेली नाही. हे तुमचे सरकार आले म्हणून आम्ही आंदोलने सुरू केली असे बिन बुडाचे आरोप करू नये. तुमचे सरकार आले म्हणून आंदोलन करण्याची खाज आम्हा मराठ्यांना आली इथपर्यंत बोलता? तुम्हाला नेमकं काय वाटतंय की समाज काहीही बोलले तर सहन करेल, असा जाबही मराठा क्रांती मोर्चाने विचारला आहे.
मविआच्या काळातही आंदोलन
मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळातही आम्ही आंदोलन केले असल्याची आठवण केदार यांनी करून दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गाजर आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात देखील खंजीर आंदोलन केले होते. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या देखील विरोधात आंदोलन केले होते. अजित पवार यांना जाहीर भाषणात थांबवून ओबीसी मधूनच आरक्षण मागितले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधात असतानाही आम्ही त्यांच्या घरावर आंदोलन केले होते. असेही केदार यांनी म्हटले.
पुन्हा अशी वक्तव्ये कराल तर...
तुम्ही मूळ पक्ष सोडून जेंव्हा गुवाहाटीला पळून गेले तेंव्हा हाच सर्वसामान्य मराठा तुमच्या बाजूने उभा होता. म्हणून तुम्ही परत आल्यावर सुखासुखी नवीन सरकार स्थापन करू शकला. आजही तुम्ही सभा घेऊ शकत आहात. जर गाव गाड्यातला अन् महाराष्ट्रातला सामान्य मराठा तुमच्या विरोधात गेला असता तर तुम्हाला कुणी जगू देखील दिलं नसतं, असेही योगेश केदार यांनी सांगितले. तुम्हाला जर एखाद्या विषयात काही माहिती नसेल तर बोलू नका. ओबीसी समाजातील नेत्यांच्या पेरलेल्या गोष्टी भाषणात बोलून मराठ्यांचा बुद्धिभेद करून समाजाचे नुकसान करू नका, असे आवाहनही मराठा क्रांती मोर्चाने तानाजी सावंत यांना केले. आम्ही आजही तुमच्या बाबत सकारात्मक आहोत. पण पुन्हा जर ओबीसी आरक्षण बाबत मराठ्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत काही चुकीची वक्तव्ये केल्यास तुम्हाला त्याची फळे भोगावी लागतील, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.