Maharashtra News Updates: चिपळूण मनसे सैनिकांकडून एलआयसीच्या कर्मचाऱ्याला कार्यालयात जाऊन चोप
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
वर्धा येथे 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तर पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन असणार आहे. तर कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. कुणाला उमेदवारी मिळणार? याबाबत चर्चा सुरु आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण सकाळी 9 वाजता भाजपच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना बजेट संदर्भात माहिती देणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वर्ध्यात सुरुवात
वर्धा - आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वर्ध्यात सुरुवात होत आहे... सकाळी 8 वाजता ग्रंथ दिंडीला सुरुवात होणार असून 10 वाजता संमेलन स्थळी ध्वजारोहण होणार आहे... तर 10.30 वाजता उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. उद्घाटन सोहळ्यात संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत..
MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन
पुणे - नवीन वर्णनात्मक अभ्यास 2023 पासूनच लागू करावा या मागणीसाठी सकाळी १० वाजता MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन... आता MPSC च्या विद्यार्थ्यांकडून UPSC च्या धर्तीवर परिक्षा घेण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे… आज सकाळी 10 वाजता पुण्यातील अलका चौकात त्यासाठी विद्यार्थी एकत्र जाणार आहेत… तीनच दिवसांपुर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून युपीएससीच्या धर्तीवर आधारित अभ्यासक्रमानुसार 2025 पर्यंत परिक्षा नकोत यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं… त्यानंतर सरकारकडून 2023 एवजी 2025 पासून नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा घेण्यात येतील असं जाहीर करण्यात आलं… मात्र विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाची याच्या नेमकी उलटी मागणी आहे... नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा 2025 पासून नव्हे तर 2023 पासूनच घेण्यात याव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि त्याचसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे
महाविकास आघाडीची बैठक
पुणे - कसबा आणि चिंचवड मतदार संघाचा उमेदवार निश्चीत करण्यासाठी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. तर पुण्यात सकाळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बैठकीला शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे आणि सचिन आहिर देखील उपस्थित रहाणार आहेत. दोन्हीही मतदार संघाच्या उमेदवारीबाबत पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत.
भाजपचीही बैठक
सकाळी 11 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचीही कसबा पोटनिवडणुकी संदर्भात बैठक होणार आहे. महाविकास आघाडीत जागा मिळाव्यात यासाठी रस्सीखेच असल्याच पहायला मिळतय... दोन्हीही जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय होणार का, बैठकीनंतर तिघेही निर्णयाला पोहचणार का याकडं सर्वांच लक्ष
नागपुरात शासकीय सुट्टीच्या दिवशीही महानगरपालिकेचे कर संकलन केंद्र राहणार सुरु
Nagpur Municipal Corporation News : नागपूर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी सुद्धा मनपा मुख्यालयासह दहाही झोन कार्यालयातील मालमत्ता कर संकलन केंद्र सुरू राहणार आहेत. कर संकलनाच्या दृष्टीने निर्णयाचे परिपत्रक जारी केले आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 या वर्षात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याकरीता तसेच मालमत्ता कर धारकांना कराचा भरणा सोईचे व्हावे म्हणून 4 फेब्रुवारी 2023 पासून 31 मार्च 2023 पर्यंत प्रत्येक शनिवार व रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशीही (दिनांक 7 मार्च,2023 धुलिवंदन वगळुन ) दहाही झोन कार्यालयातील मालमत्ता कर संकलन केंद्र व सिव्हील कार्यालय मालमत्ता कर संकलन केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात पुण्यात गुप्तबैठक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात पुण्यात एक गुप्तबैठक पार पडणार आहे. या बैठकीत चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करून, ती नावं केंद्राकडे पाठवली जाणार आहेत. अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. हे तिन्ही नेते आज पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आलेले आहेत. त्याच दरम्यान ही बैठक पार पडणार आहे. बैठकीच्या ठिकाणाबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही. चिंचवडमध्ये दिवंगत लक्ष्मण जगताप कुटुंबियातील उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आणखी विकोपाला जाऊ नये. म्हणून ही तातडीची बैठक होत असल्याचं बोललं जातंय. तर कसबा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबा व्यतिरिक्त उमेदवार देण्याबाबत ही या बैठकीत चर्चा होईल, अशी सूत्रांनी माहिती दिलीये.
चिंचवड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस कडून शर्यतीत असणाऱ्या पाच इच्छुकांनी नामनिर्देश पत्र घेतले
चिंचवड विधानसभा इच्छुकांची विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी काल बैठक घेतली अन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन इच्छुकांनी नामनिर्देश पत्र घेतलेले आहेत. भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे आणि प्रशांत शितोळे यांनी ही उमेदवारीसाठी दावा केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस कडून शर्यतीत असणाऱ्या पाच इच्छुकांनी नामनिर्देश पत्र घेतलेत. याआधी राजेंद्र जगताप आणि नाना काटे यांनी उमेदवारीसाठी ईच्छा व्यक्त केलेली आहे. उमेदवार आयात न करता पक्षातीलच द्यावा या मागणीनंतर इच्छुकांची भाऊगर्दी वाढू लागलीये.
Chiplun MNS: चिपळूण मनसे सैनिकांकडून एलआयसीच्या कर्मचाऱ्याला कार्यालयात जाऊन चोप
चिपळूण एल आय सी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला मनसे सैनिकांनी कार्यालयात जाऊन चांगलाच चोप दिला. हा कर्मचारी गेले वर्षेभर चिपळूण खेड येथील ब्यूटीपार्लर व्यावसायिक महिलेला मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून महिलेने चिपळूण पोलिस ठाण्यात दोन वेळा तक्रारही केली होती. या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने शेवटी या महिलेने मनसे सैनिकांची भेट घेऊन तक्रार केली. त्यानंतर मनसैनिकांनी एलआयसीच्या कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला. याबाबत पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूने तक्रार नोंदवण्यात आली आहे.
VI Network Down : व्हीआयचं नेटवर्क डाऊन, कॉलिंग आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प
Vodafone Idea Network Down : मुंबईत अनेक ठिकाणी व्होडाफोन आयडियाचं (VI - Vodafone Idea) नेटवर्क डाऊन आहे. व्हीआयचा सर्व्हर डाऊन आहे. कॉलिंग आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुमारे तासाभरापासून व्होडाफोन आयडिया ग्राहकांची सेवा खंडीत झाली आहे. यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतोय.