धुळ्यात डोलची तयार करणाऱ्या कारागिरांपुढे महागाईचे संकट, डोलचीने होळी कशी खेळतात?
धुळे जिल्हा हा त्याच्या अनोख्या पद्धतीने होळी खेळण्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. होळी खेळण्यासाठी वापरण्यात येणारी डोलची हा चर्चेचा विषय असतो. परंतु डोलची बनवणाऱ्या कारागिरांसमोर सध्या महागाईचं संकट आहे.

धुळे : संपूर्ण देशात आणि राज्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीचा सण राज्यात विविध पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा पेटवून होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळून होळी साजरी केली जाते तर काही ठिकाणी होळीनंतर येणाऱ्या पाचव्या दिवशी म्हणजे रंगपंचमीला होळीचा सण साजरा केला जातो. धुळे जिल्हा हा त्याच्या अनोख्या पद्धतीने होळी खेळण्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. होळी खेळण्यासाठी वापरण्यात येणारी डोलची हा चर्चेचा विषय असतो. डोलची म्हणजे काय हे जाणून घेऊया.
धुळे जिल्ह्यातील होळी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून होळीला डोलचीचा वापर करुन पाण्याचे फटके एकमेकांना मारले जातात. पत्र्यापासून तयार करण्यात आलेली ही डोलची तयार करण्याचं काम सध्या कारागिरांकडून मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा या डोलचीला असून इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पत्र्याचे भाव वाढल्याने डोलची तयार करणं परवडत नसल्याची प्रतिक्रिया कारागिरांनी व्यक्त केली आहे.
पूर्वीच्या काळी 25 ते 30 रुपयाला मिळणारी डोलची सध्या 50 ते 55 रुपयांना मिळत आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला होता. मात्र यंदा सण साजरा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली असली तरी दरवर्षाच्या तुलनेत डोलचीला मागणी कमी असल्याचं कारागिरांनी सांगितलं.
अशी खेळतात डोलीचीने होळी!
डोलजी म्हणजे पत्र्यापासून तयार केलेलं भांडं असतं. होळी खेळताना यात पाणी भरुन एकमेकांच्या पाठीवर वार करतात. पाण्याचा सपासप वार उघड्या शरीरावर बसल्याने अंगाची लाहीलाही होते. परंतु खेळणाऱ्यांचा उत्साह मात्र कमी होत नाही, उलट दुप्पट उत्साहाने ते एकमेकांवर डोलचीमध्ये पाणी उडवतात. डोलीचीने होळी खेळताना जणू आखाड्याचंच वातावरण होतं.
खरंतर रंगांची मुक्त उधळण करणारा तसंच एकमेकांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु डोलची तयार करणाऱ्या कारागिरांसमोर महागाईचं संकट ओढावलं आहे. त्यामुळे त्यांची यंदाची होळी बेरंगी होईल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
