(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli Rail Roko: रेल्वेवर चढून हिंगोलीकरांचं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
Hingoli Rail Roko Protest: यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.
Hingoli Rail Roko Protest: हिंगोली ते मुंबई रेल्वे फेरी सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आणि हिंगोलीतील व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र प्रशासन याला गांभीर्याने घेत नसल्याने आज अखेर रेल्वे संघर्ष समिती आणि व्यापाऱ्यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी हिंगोली येथील रेल्वे स्टेशनवर मोर्चा काढून रेल्वे रोखण्यात आली. तर आंदोलकांनी रेल्वेवर चढून जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.
हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना जर मुंबईला जायचं असेल तर परभणी किंवा नांदेड येथून पुढील प्रवास रेल्वेने करावा लागतो. त्यामुळे हिंगोलीहून मुंबईसाठी रेल्वे फेरी सुरू करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून रेल्वे संघर्ष समिती, व्यापारी आणि हिंगोलीकर प्रशासन दरबारी करत आहेत. परंतु याची कोणतीही दखल प्रशासनाने अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे आज रेल्वे संघर्ष समिती, व्यापारी आणि पत्रकारांच्यावतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी नऊ वाजता सर्व आंदोलक हे गांधी चौकामध्ये एकत्र झाले. पुढे गांधी चौकातून निघालेला मोर्चा हिंगोली रेल्वे स्थानकावर जाऊन धडकला.
रेल्वे स्थानकावर येताच आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरु केली. तर रेल्वे राज्यमंत्री मराठवाड्याचे असताना सुद्धा मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला मुंबईला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे आंदोलन करावे लागत असल्याची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. यावेळी आंदोलनामध्ये विविध संघटना आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सहभाग नोंदविला. दरम्यान स्थानिक रेल्वे प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते.यावेळी पोलिसांनी आंदोलकांना आडविण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक थेट रेल्वे रुळावर पोहोचले. तर रेल्वे स्थानकावर आलेली अमरावती तिरुपती एक्सप्रेस आंदोलकांनी रोखून धरली. विशेष म्हणजे रेल्वेच्या इंजिनवर चढून आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याने पोलिसांची धावपळ उडाली.
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या
- जालना छपरा एक्सप्रेस पुर्णा, हिंगोली, अकोला मार्गे चालवावी
- वाशिम, हिंगोली, वसमत मार्गे मुंबईसाठी रेल्वे सुरु करावी
- हिंगोली रेल्वे स्टेशनवर गुड्स शेड उभारावे
- वसमत स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्र. 2 वरील माल धक्का बंद करावा
आंदोलनात सर्वपक्षीय नेते मंडळींचा सहभाग
हिंगोली ते मुंबई रेल्वे सुरु करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळींचा सहभाग पाहायला मिळाला. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यासह अनेक सामाजिक संघटना, व्यापारी त्याचबरोबर वकील आणि पत्रकारांचा सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग दिसून आला. तर स्थनिक वेगवेगळ्या संघटनांनी देखील या आंदोलनात सहभाग नोंदवत पाठींबा दिला.
गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू...
हिंगोलीच्या रेल्वे प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे संघर्ष समिती व त्याचबरोबर व्यापारी पाठपुरावा करत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील अनेकदा आंदोलन आणि निदर्शने देखील करण्यात आले. राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी सुद्धा संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली होती. परंतु त्यातून अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज अखेर हिंगोलीकरांनी आक्रमक पवित्रा घेत थेट रेल्वे रोको आंदोलन केले.