साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेनंतर कोरोना रुग्ण वाढले, गावातील 61 जण पॉझिटिव्ह
साताऱ्यात बावधनची बगाड यात्रा झाल्यापासून गावातील 61 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे यात्रा भरवण्याचा हट्ट गावकऱ्यांच्या अंगलट आल्याचं चित्र आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील बावधनची बगाड यात्रा अंगलट आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यात्रा झाल्यापासून गावातील 61 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा ही महाराष्ट्रात सर्वात मोठी बगाड यात्रा समजली जाते. यात्रेदरम्यान झालेल्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी 83 जणांवर अटकेची कारवाई देखील केली होती.
राज्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना यात सातारा जिल्हा देखील मागे नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बावधनच्या बगाड यात्रेच्या आयोजनावर बंदी घातली होती. बावधनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी आणि यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण गावाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलं होतं. परंतु प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करत बावधनची बगाड यात्रा 2 एप्रिल रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली.
Satara : बावधन बगाड यात्रेला तुफान गर्दी, अडीच हजार लोकांवर गुन्हे, आतापर्यंत 83 लोकांना अटक
यात्रा झाल्यानंतर आता गावातील 61 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. शिवाय वाई तालुक्यातही कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे.
83 जणांना अटक आणि जामीन
बावधन बगाड यात्रा भरवल्या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात अडीच हजार बावधनकरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होती. यातील 83 जणांना पोलिसांनी अटक केली. या सर्वांना वाई न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पाच हजार रुपयांच्या अनामत रकमेवर जामीन दिला.