Marathwada Rain Update: अवकाळीमुळे मराठवाड्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, 62 हजार 480 हेक्टर पिकांचे नुकसान
Marathwada Rain Update: अवकाळीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आकडा 33 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
Marathwada Rain Update: राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसताना पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 62 हजार 480 हेक्टरवरील पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहेत. तर याच अवकाळी पावसामुळे विभागात वेगवेगळ्या दुर्घटनेत सहा लोकांचा मृत्यू झाला असून, 36 जण जखमी झाले आहेत. तसेच 76 लहान-मोठी जनावरे दगावली आहेत. गेल्या 24 तासात सरासरी 10. 44 मिलिमीटर पावसाची नोंद विभागात झाली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आकडा 33 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
अवकाळी पावसामुळे सर्वाधिक फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. 1 मार्च ते 19 मार्च दरम्यान मराठवाड्यात एकूण 62 हजार 480 हेक्टरचे नुकसान झाले आहे. ज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 हजार 314 शेतकऱ्यांचे एकूण 7 हजार 762.50 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील 4 हजार 500 शेतकऱ्यांचे एकूण 2 हजार 400 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील 13 हजार 286 शेतकऱ्यांचे एकूण 5 हजार 604 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील 19 हजार 899 शेतकऱ्यांचे एकूण 23 हजार 554 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील 13 हजार 286 शेतकऱ्यांचे एकूण 5 हजार 604 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. तर लातूर जिल्ह्यातील 16 हजार 842 शेतकऱ्यांचे एकूण 11 हजार 794 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे.
पंचनामे रखडले!
अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील 62 हजार 480 हेक्टरचे नुकसान झाले आहे. मात्र असे असताना प्रशासनाकडून पंचनामे होताना दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे या संपात तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह इतर महसूल कर्मचारी सहभागी आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे वेळेवर पंचनामे न झाल्यास याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. तसेच वेळेत नुकसानभरपाई देखील मिळणार नाही.
रब्बीचे हंगामदेखील हातून गेले...
गेली तीन वर्षांपासून मराठवाड्यात सतत अतिवृष्टी पाहायला मिळत आहे. तर यंदाही खरीप सुरु होताच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे किमान रब्बीच्या हंगामात तरी काही हाती येईल अशी अपेक्षा बळीराजाला लागली होती. परंतु रब्बीच्या हंगामात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. त्यातच नुकसानीचे पंचनामे देखील होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Marathwada Rain: मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान